घरताज्या घडामोडीचंद्रकांत पाटील म्हणतात, 'अजित पवार, आम्ही तुमचे बाप आहोत!'

चंद्रकांत पाटील म्हणतात, ‘अजित पवार, आम्ही तुमचे बाप आहोत!’

Subscribe

२०१९ मध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांनंतर झालेला सत्तास्थापनेचा तमाशा आख्ख्या महाराष्ट्रानं पाहिला. पहाटेच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अजित पवार यांनी घेतलेली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ देखील सगळ्यांनी पाहिली. मात्र, तितक्याच वेगाने सत्तेतून बाहेर देखील पडत अजित पवारांनी भाजपला चांगलाच धक्का दिला होता. तेव्हापासून भाजप आणि अजित पवार यांच्यामध्ये छुपं युद्ध की छुपी युती? अशी चर्चा कायमच महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरू असते. त्यातच आता भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यामध्ये भाजपच्या एका कार्यक्रमात बोलताना अजित पवारांवर कडवट शब्दांमध्ये टीका केली आहे. ‘पुणे पालिका प्रभाग समितीच्या निवडणुकीमध्ये अजित पवारांना पुढची काही स्वप्न पडत आहेत. पण त्यांनी फार एनर्जी वाया घालवू नका. आम्ही पण तुमचे बाप आहोत’, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. पाटलांच्या या वक्तव्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्याला कसं उत्तर दिलं जातं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यानंतर अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांना दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे नेते मानलं जातं. अजित पवारांकडेच शरद पवारांचे उत्तराधिकारी म्हणून देखील पाहिलं जात आहे. अजित पवारांचा स्वत:चा दांडगा जनसंपर्क आणि काम त्यांना शरद पवारांहून वेगळं असं राजकीय वलय मिळवून देत राहिला आहे. मात्र, त्याच अजित पवारांवर अशा भाषेत टीका करणं चुकीचं असल्याची प्रतिक्रिया उमटू लागली आहे.

- Advertisement -

नक्की झालं काय?

नुकत्याच पुणे महानगर पालिकेमध्ये प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये १६ पैकी ११ जागांवर भाजपच्या सदस्यांचा विजय झाला आहे. याशिवाय एक जागा काँग्रेसकडे तर ४ जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर कोथरूडमध्ये पार पडलेल्या भाजपच्या व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांच्या वेळी पाटील बोलत होते. ‘या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या सर्व जागा भाजपला मिळायला हव्या होत्या अशी काहीतरी जादू व्हायला हवी होती. पण तसं झालं नाही. अजित पवारांना त्या पुढची काहीतरी स्वप्न पडत आहेत. त्यावर त्यांनी जास्त ऊर्जा खर्च करू नये. आम्हीही अजित पवारांचे बाप आहोत’, असं पाटील यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -