घरमहाराष्ट्र...तर मुख्यमंत्री पद सोडणार नाही - चंद्रकांत पाटील

…तर मुख्यमंत्री पद सोडणार नाही – चंद्रकांत पाटील

Subscribe

‘पक्षाने मला मुख्यमंत्री पदाची संधी दिली तर मी ती संधी सोडणार नाही’, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. पुण्यात श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालापाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांना आदित्य ठाकरे यांच्याबाबत प्रश्न विचारला गेला असता आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री पदाला सक्षम आहेत कि नाही? हे मतदार ठरवतील, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात कोणत्या घडामोडी घडतील याचा अंदाज बांधणे कठीण आहे. या कार्यक्रमावेळी व्यासपीठावर संघाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, उपाध्यक्ष अभिजित बारभाई उपस्थित होते.

नेमके काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

पदवीधर मतदार संघाऐवजी आगामी विधानसभा निवडणुकीत पुणे आणि कोल्हापूर येथून निवडणूक लढविण्याच्या चर्चेविषयी त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्या प्रश्नाचे उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘मला पक्ष सांगेन तेथून निवडणूक लढवेल. अगदी गडचिरोली मतदार संघातून लढण्याची आणि विजयी होण्याची तयारी आहे.’ त्यानंतर पक्षाने संधी दिली तर मुख्यमंत्री होणार का? असा प्रश्न विचारला गेला. त्यावर उत्तर देताना चंद्रकांत पाटील ‘अशी संधी मिळाली तर मी सोडणार नाही’, असे म्हणाले. शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्री पदाकरिता पुढे आणले जात आहे, ते त्या पदाला सक्षम आहेत का? असा प्रश्न विचारला गेला असता ‘ते मतदार ठरवतील’, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

- Advertisement -

‘भाजपने कुणावरही दबाव टाकलेला नाही’

सध्या भाजपात सुरु असलेल्या इनकमिंगबाबतही चंद्रकांत पाटील यांवी यावेळी भाष्य केले. लवकरच काँग्रेसमधील काही नेते भाजपात प्रवेश करणार असल्याचे सुतोवाच पाटील यांनी केले. दरम्यान, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे ते नेते भाजपात प्रवेश करत असल्याची चर्चा सुरु आहे. याशिवाय भाजपकडून दबाव टाकून पक्षात सामील केले जात असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भाजपकडून कोणताही दबाव कुठल्याही नेत्यावर टाकण्यात आला नसल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. याशिवाय ‘भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला असला तरी, त्यांच्यावरील चौकशीचा अहवाल आलेला नाही. काही प्रकरणे न्यायालयात आहेत. कोणालाही राजकीय फायदा दिला जाणार नाही’, असेही पाटील म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -