घरमहाराष्ट्रछगन भुजबळ शिर्डीत... साईबाबा जन्मस्थान वादावर म्हणतात...

छगन भुजबळ शिर्डीत… साईबाबा जन्मस्थान वादावर म्हणतात…

Subscribe

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शिर्डीमध्ये जाऊन भाविकांचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी साईबाबांच्या जन्मस्थानावरून सुरू झालेल्या वादावर प्रतिक्रिया दिली.

‘शिर्डी के साईबाबा’ हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. पण साईबाबा शिर्डीचे नसून पाथरीचे आहेत, परभणीतल्या पाथरीमध्ये त्यांचा जन्म झाला असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाषणात सांगितलं आणि त्यावरून नवा वाद निर्माण झाल आहे. त्यामुळे शिवाजी महाराज आणि इंदिरा गांधी यांच्याविषयीच्या वादानंतर आता साईबाबांच्या जन्मस्थानाविषयीचा वाद सुरू झाला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी दाखल झाले. यावेळी त्यांना पत्रकारांनी विचारलं असता या वादावर त्यांनी त्यांची भूमिका मांडली.

‘साईबाबा सगळ्यांचे आहेत…’

दरम्यान, यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले, ‘अशा प्रकारे बंद करून त्यातून प्रश्न सुटेल असं मला वाटत नाही. मुख्यमंत्र्यांनी उद्या बैठक बोलावली आहे. या बैठकीत दोन्ही पक्षांचं म्हणणं ऐकल्यानंतर त्यावर ते स्वत: विचार मांडतील. मला जुना गोषवारा माहिती नाही. इतर कुणालाही माहिती नाही. लोकं सांगतात, त्यावर बोलतात. साईबाबांनी स्वत: म्हटलं आहे की माझी जात-पात, धर्म, जन्मस्थळ या बाबतीत वाद घालू नये. मी सर्व धर्मांचा आहे. सर्व जातींचा आहे. साईबाबा हे सगळ्यांचे आहेत. साईबाबंची मंदिरं भारताप्रमाणेच मुंबई, अमेरिका, जपान या ठिकाणी देखील आहेत. प्रतिशिर्डी आहेत. भाविक सगळीकडे जाऊन दर्शन घेतात’.

- Advertisement -

बंदमुळे नुकसान…

दरम्यान, या बंदमुळे शिर्डीत १० हजार भाविक कमी आल्याचं भुजबळांनी यावेळी सांगितलं. ‘आज गर्दी कमी झाली आहे. अनेकांनी आपली हॉटेलची बुकिंग रद्द केली आहेत. या वादामुळे भक्तांच्या मनात किंतु निर्माण होतो. तसं होता कामा नये. या मुद्द्यावर शांतपणे चर्चा करायला हवी. त्यातून वाद वाढू नये. देशात आधीच खूप मोठे वाद आहेत. साईबाबांना देखील ते आवडणार नाही. शिर्डीला पारशी, हिंदु, मुस्लीम असे सगळ्या धर्माचे लोकं येतात. अशा परिस्थितीमध्ये अशी ठिकाणं वादात येऊ नयेत’, असं ते म्हणाले. ‘राजकारण्यांनी या मुद्द्यावर उगीच वाद करू नये. सगळ्या झेंड्याचे लोक इथे येतात. साईबाबांना कोणत्याही झेंड्य़ाचं वावडं नाही. शिर्डी या नावाभोवती एक वलय आहे. त्याचा वाद लवकर जगभर पोहोचतो. तसं होता कामा नये’, असं देखील भुजबळांनी नमूद केलं.


वाचा सविस्तर – साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद चिघळला; आजपासून शिर्डी बंद
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -