Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र 'संभाजी महाराजांना क्रूररित्या मारलं, त्याचं नाव...'; औरंगाबाद नामांतरावर संभाजीराजेंचं मोठं विधान

‘संभाजी महाराजांना क्रूररित्या मारलं, त्याचं नाव…’; औरंगाबाद नामांतरावर संभाजीराजेंचं मोठं विधान

Related Story

- Advertisement -

औरंगाबाद नामांतराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्यासाठीचा प्रस्ताव शिवसेनेने दिला होता. यावरुन राजकीय वर्तुळात वाद सुरु झाला आहे. दरम्यान, नामांतराच्या मुद्द्यावर खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी भाष्य केलं आहे. ज्या मोगल बादशहाने छत्रपती संभाजी महाराजांना पकडून क्रूररित्या मारलं, त्याचं नाव महाराष्ट्रातील एका मोठ्या शहराला असावं हे दुर्दैवी असल्याचं संभाजीराजे म्हणाले. औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर करणे अतिशय योग्य असल्याचं म्हणत एकप्रकारे औरंगाबाद नामांतराला पाठिंबा दिला आहे.

राज्यात सध्या औरंगाबाद नामांतराचा मुद्दा चांगलाच गाजतोय. औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकार धोक्यात येऊ शकतं असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कारण शिवसेनेच्या नामांतराच्या मागणीला काँग्रेसने विरोध केला आहे. त्यात आता खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी नामांतराबाबत मोठं विधान केलं आहे. “ज्या मोगल बादशहाने छत्रपती संभाजी महाराजांना पकडून क्रूररित्या मारलं, त्याचं नाव महाराष्ट्रातील एका मोठ्या शहराला असावं हे दुर्दैवी आहे. सर्व शिवभक्तांच्या भावेनाचा आणि अस्मितेचा विचार करुन सरकारने लवकर निर्णय घ्यावा,” असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. याबाबतचं ट्विट संभाजीराजे यांनी केलं आहे.

- Advertisement -

औरंगाबाद महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबाद नामांतराचा वाद उफाळून आला आहे. नामांतरावरुन आता राजकीय आरोप-प्रत्यारोप, आश्वसनं देणं सुरु झालं आहे. शिवसेनेच्या नामांतराच्या मागणीला काँग्रेसने विरोध केला आहे. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबाद महापालिकेत सत्ता आल्यास पहिल्याच दिवशी औरंगाबादचं नाव संभाजीनगर करु असं म्हटलं.

 

- Advertisement -