घरदेश-विदेशपी. चिदंबरम यांना अटक; आज कोर्टात हजर करणार

पी. चिदंबरम यांना अटक; आज कोर्टात हजर करणार

Subscribe

दिल्लीतील बंगल्यात केली कारवाई

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) एकाचवेळी दोन नेत्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारल्याने देशभर एकच खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपवर आरोपाची राळ उडवणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर कोहिनूर स्क्वेअर खरेदी व्यवहारात मनिलॅण्डरिंगच्या कथित आरोपावरून २२ तारखेला ईडीच्या कार्यालयात उपस्थित राहण्याची नोटीस पाठवली आहे. तर दुसरीकडे आयएनएक्स मीडिया घोटाळ्यातील प्रमुख आरोपी म्हणून माजी केंद्रिय मंत्री पी. चिदंबरम यांना ईडी आणि सीबीआयने बुधवारी रात्री ९.३० वाजता अटक केली. या दोन्ही नेत्यांविरोधात सत्ताधारी भाजपने जाणीवपूर्वक आणि आकसाने ही कारवाई केल्याचा आरोप विरोधीपक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेने केला आहे.

आयएनएक्स मीडिया घोटाळाप्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांना सीबीआय आणि ईडीने अटक करताना बुधवारी रात्री दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा रंगला. त्यांच्या बंगल्याच्या कुंपणावरून चढून सीबीआयचे अधिकारी आत शिरले आणि त्यांनी चिदंबरम यांना अटक केली. गुरूवारी त्यांना सीबीआय कोर्टात हजर केले जाणार आहे. सुप्रीम कोर्टाने अटकपूर्व जामिनाबाबत लगेच दिलासा देण्यास इन्कार केल्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या मुख्यालयात पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडली. त्यानंतर सीबीआयने कारवाई केली.

- Advertisement -

 त्यानंतर सीबीआयचे अधिकारी चिदंबरम यांच्या घरी गेले आणि त्यांना अटक केली. त्यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चिदंबरम यांच्या बंगल्याबाहेर गोळा होऊन सीबीआय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.

आयएनएक्स मीडिया घोटाळा प्रकरणात चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन दिल्ली हायकोर्टाने मंगळवारी फेटाळला. त्यानंतर कोणत्याही क्षणी चिदंबरम यांना अटक होण्याची शक्यता होती. त्यामुळे चिदंबरम यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. मंगळवारी सुप्रीम कोर्टाने चिदंबरम यांच्या याचिकेची तातडीने दखल घेण्यास नकार दिला. तसेच याचिकेबाबत बुधवारी निर्णय घेऊ असे सांगितले. दरम्यान, सोमवारी रात्री ईडी, सीबीआयचे पथक चिदंबरम यांच्या घरी पोहचले. मात्र चिदंबरम बेपत्ता झाले होते. त्यामुळे नोकरांची चौकशी करून ही पथके माघारी परतली.

- Advertisement -

चिदंबरम यांच्या वकिलांनी बुधवारी पुन्हा अर्ज केला. त्यावर सुप्रीम कोर्टाच्या न्या. रमण्णा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यांनी या प्रकरणी कोणतेही आदेश दिले नाहीत. हे प्रकरण त्यांनी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याकडे पाठवले. गोगोई यांनी या प्रकरणावर शुक्रवारी सुनावणी करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

ईडी आणि सीबीआयने चिदंबरम यांच्याविरोधात काढलेली लुकआऊट नोटीस रस्ते परिवहन, हवाई दल आणि नौदलाला पाठवली होती. त्यात चिदंबरम यांना ईडीच्या परवानगीशिवाय भारताबाहेर जाऊ न देण्याचे आदेश दिले.

माझ्यावर कोणतेही आरोपपत्र नाही -चिदंबरम
आयएनएक्स प्रकरणात मी कधीही आरोपी नव्हतो. माझ्यावर कोणतेही आरोपपत्र दाखल झालेले नाही, असा दावा पी. चिदंबरम यांनी काँग्रेस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

सीबीआय किंवा ईडीने कोणतेही आरोपपत्र दाखल केलेले नाही, माझा मूलभूत हक्क हिरावला जात आहे. मागील २७ तासांपासून अनेक भ्रम पसरविले जात आहेत. मी आणि माझे कुटुंब यात दोषी नाही. कोणत्याही आरोपपत्रात माझे नाव नाही. सुप्रीम कोर्टात याबाबत अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे. शुक्रवारी याबाबत सुनावणी होईल. गेल्या २७ तासांत वकिलांसोबत पुढील लढ्याची तयारी करत होतो. रात्रभर कागदपत्रे तयार केली जात होती. तपास यंत्रणांनीही कायद्याचे पालन केले पाहिजे. स्वातंत्र्य हा लोकशाहीचा मूलभूत आधार आहे. अशावेळी जीवन आणि स्वातंत्र्य यापैकी मला काही निवडण्यास सांगितल्यास मी स्वातंत्र्याला प्राधान्य देईन, असेही चिदंबरम म्हणाले.

सीबीआयची कारवाई
चिदंबरम यांनी पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडल्यावर त्यांनी पत्रकारांच्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. ते आपल्या घरी निघून गेले. चिदंबरम पत्रकार परिषद घेत असताना सीबीआयने कारवाईची तयारी केली. चिदंबरम घरी पोहोचताच काही मिनिटांतच सीबीआयचे पथक चिदंबरम यांच्या बंगल्यावर पोहचले. मात्र बंगल्याचे गेट बंद होते. ते उघडले जात नव्हते. त्यामुळे सीबीआयचे अधिकारी बंगल्याच्या कुंपणावर चढून आत शिरले. त्यानंतर त्यांनी चिदंबरम यांना ताब्यात घेऊन अटक केली.

पी. चिदंबरम यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यासाठीच मोदी सरकार ईडी, सीबीआय आणि काही कणाहीन माध्यमांचा वापर करत आहे. मोदी सरकारकडून सत्तेचा गैरवापर केला जात असून, मी त्याचा तीव्र निषेध करतो.
-राहुल गांधी, काँग्रेस नेते .

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -