घरदेश-विदेशमुख्यमंत्री फडणवीसांनी पुढाकार घेत कर्नाटकचे आमदार फोडले

मुख्यमंत्री फडणवीसांनी पुढाकार घेत कर्नाटकचे आमदार फोडले

Subscribe

नरेंद्र मोदी आणि अमित शाह या जोडीचा देशात हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न असून पैसा आणि सत्तेचा गैरवापर करून विरोधी पक्षांची सरकारे पाडण्याचा जोरदार प्रयत्न सुरु आहे. आमदार फोडायला आणि त्यांची पंचतारांकीत बडेजाव ठेवायला भाजपकडे एवढा पैसा कुठून आला? कर्नाटक सरकार पाडण्याचे काम त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले होते. फडणवीसांनी गेले एक महिना कर्नाटकच्या आमदारांना मुंबईत हॉटेलमध्ये ठेवून हे तोडाफोडीचे काम केले, असा घणाघाती आरोप अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे सहप्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. हा आरोप करताना त्यांनी काँग्रेसची लढाई फक्त निवडणुकीपुरती नसून देशाची लोकशाही व संविधानाच्या रक्षणाची जबाबदारी असल्याचे सांगत कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला.

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह नवनियुक्त कार्याध्यक्ष डॉ. नितीन राऊत, बसवराज पाटील, विश्वजीत कदम, आमदार यशोमती ठाकूर, मुजफ्फर हुसेन यांचा पदग्रहण सोहळा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे गुरुवारी पार पडला.

- Advertisement -

जनतेच्या प्रश्नावर आंदोलने केली, प्रसंगी रस्त्यावर उतरून संघर्ष केला. पण, दुर्देवाने फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात अनपेक्षित निकाल लागले. कर्नाटकचे आमदार फोडून त्यांना विशेष विमानाने आणून त्यांची बडदास्त महिनाभर ठेवण्यात आली. सत्ता, पैशाबरोबर पोलीस बळाचाही वापर झाला. गोव्यातही काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवताना भाजपने पैशांच्या थैल्या सोडल्या. हा प्रकार म्हणजे विरोधकांना संपवून देशात हुकुमशाही आणण्याचा आहे, असेही खर्गे म्हणाले.

आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय निश्चित आहे. मात्र राज्यातील काँग्रेसच्या प्रत्येक नेत्याने किमान चार जागा जिंकून आणायला हव्यात. फक्त तीन महिने निवडणुकीला उरले आहेत. आव्हान कठीण आहे, पण काँग्रेसने अशा आव्हानांचा मुकाबला करत विजय मिळवला आहे. नवे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे कमी बोलतात आणि खूप काम करतात. यामुळे काँग्रेस नक्की यश मिळवेल, याकडे खर्गे यांनी लक्ष वेधले.

- Advertisement -

माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्ष नते विजय वडेट्टीवार, विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, गुजरातचे प्रभारी राजीव सातव, हिमाचल प्रदेशच्या प्रभारी रजनी पाटील, किसान काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, नसीम खान महिला काँग्रेसच्या अध्यक्षा चारूलता टोकस यांनी थोरात यांना शुभेच्छा दिल्या.

विधानसभेत लोकसभेपेक्षा वेगळे निकाल लागतील!

बाळासाहेब थोरातांचा विश्वास

गेल्या चार वर्षांत राज्यातील शेतकरी, कष्टकरी, महिला, तरूण, व्यापारी, सगळेच संकटात आहेत. कर्जमाफी नाही. पीक कर्ज मिळत नाही. तसेच काँग्रेस सरकारच्या काळातील निकष या सरकारने बदलल्याने शेतक-यांना पीक विमा मिळत नाही. दुष्काळी मदत नाही. शेतीमालाला भाव नाही. कृषी क्षेत्र अडचणीत आल्यामुळे इतर क्षेत्रात मंदी आली आहे. पण सरकारला याचे काही सोयरसुतक नाही. भाजप -शिवसेना सरकार खोट्या जाहिरातीद्वारे लोकांची फसवणूक करत आहे.

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका वेगवेगळ्या असतात त्यामुळे विधानसभेला लोकसभेपेक्षा वेगळा निकाल येईल आणि काँग्रेस पुन्हा एकदा सत्तेत येईल, असा विश्वास काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

थोरात यांनी नवा पदभार स्वीकारल्यानंतर गुरुवारी यशवंत राव चव्हाण सभागृहात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सरकारवर हल्लाबोल केला. सरकारविरोधात लोकांमध्ये प्रचंड रोष आहे. समाजातला एकही घटक सरकारच्या कामगिरीवर समाधानी नाही. काँग्रेस पक्षाकडे कार्यकर्ते आणि नेत्यांची मोठी टीम असून सरकारचे अपयश जनतेसमोर मांडू आणि १९८० च्या विजयाची पुनरावृत्ती करू. काँग्रेस विचार शाश्वत असून सर्वसामान्यांच्या अंत:करणात काँग्रेस पक्ष आहे, असे थोरात म्हणाले.

चंद्रकांतदादा बाता मारू नका
काँग्रेसमुक्त महाराष्ट्राच्या बाता मारणार्‍या चंद्रकांत पाटलांना स्वतःचे काय होणार ते माहित नाही. त्यामुळे त्यांनी दुसर्‍यांबद्दल बोलू नये, असा टोला लगावून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विखारी विचारधारेचा निकराने प्रतिकार करू,असे थोरात म्हणाले.

राधाकृष्ण विखे संधीसाधू

काही संधीसाधू लोक पक्ष सोडून गेल्याने युवकांना मोठ्या प्रमाणात संधी आहे. असे लोक पक्ष सोडून गेल्याने काही फरक पडत नाही, असे राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव न घेता थोरातांनी त्यांच्यावर टीका केली. ते बोलत असताना सभागृहातून नाव घ्या, असा आवाज आला. मात्र थोरात यांनी या विषयावर अधिक काही बोलणे टाळले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -