घरमहाराष्ट्रयुती असो नसो, निवडणुकीच्या तयारीला लागा - मुख्यमंत्री

युती असो नसो, निवडणुकीच्या तयारीला लागा – मुख्यमंत्री

Subscribe

शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर भाजपकडून युती करण्यासंदर्भात पुढाकार घेतला गेला. मात्र शिवसेनेकडून प्रतिसाद मिळत नसल्याने आता भाजपनेही शिवसेनेला प्रत्युत्तर दिले आहे. पालघरमध्ये भाजपला मिळालेल्या यशामुळे शिवसेनेशी युती नसतानाही आपण जिंकू शकतो, त्यामुळे शिवसेना सोबत असो किंवा नसो आगामी निवडणुकीच्या तयारीला लागा, असा आदेशच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे.

बैठक भाजपची, चर्चा शिवसेनेची
राज्यात झालेल्या पोटनिवडणुकीनंतर दादर इथल्या वसंतस्मृती सभागृहात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या आजच्या बैठकीत शिवसेना पक्षावरच अधिक चर्चा झाली. भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत पक्षाच्या पदरी अपयश आले असले तरी पालघरमध्ये शिवसेनेशी सामना करताना ही पोटनिवडणूक भाजपाला कठीण जाईल, असे वाटत होते. परंतु पालघरमध्ये मिळालेल्या विजयामुळे मित्र पक्ष शिवसेनेशी युती होवो अथवा न होवो आगामी निवडणूकीच्या तयारीला लागा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या.

- Advertisement -

युतीसाठी दोन्ही पक्ष तयार असायला हवेत – दानवे
या बैठकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले की, “शिवसेनेबरोबर भाजप युती करण्यास तयार आहे. राज्यात लोकसभेच्या दोन पोटनिवडणूका झाल्या. मात्र पालघरमध्ये सर्व विरोधक एकत्र असताना देखील आम्ही निवडूण आलो आहोत. देशात भाजप विरोधात सर्वांनी एकत्र यावे यासाठी हलचाल सुरू आहे. मात्र भाजपच्या विचारांशी सहमत असलेल्या पक्षांनी एकत्र यावे, यासाठी आमचे प्रयत्न आहेत. एका पक्षाने पुढाकार घेऊन युती होत नाही. शिवसेनेनेही एकत्र यायला हवं.”

भाजपचे राजकीय खेळ
भाजपने मुबंई महापालिका निवडणुकीत शिवसेनेबरोबर युतीची चर्चा करताना प्लान ‘ए’ आणि प्लान ‘बी’ असा फॉर्म्युला तयार केला होता. हाच फॉर्म्युला आता शिवसेनेबरोबर युती झाली नाही तर मुंबई आणि कोकणातील शिक्षक-पदवीधर मतदारासंघाच्या निवडणुकीत शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपने मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याचं म्हटलं जात आहे. यासाठीं विनोद तावडे यांनी राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर जाऊन भेट घेत मुंबई आणि कोकणातील शिक्षक-पदवीधर मतदारासंघाच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा केली. तर दुसरीकडे गिरीश महाजन यांनी छगन भुजबळ यांची भेट घेत नाशिक विधान परिषद निवडणूकी संदर्भात चर्चा करून भाजपने राजकीय खेळी तयार केली असल्याची राजकीय क्षेत्रात चर्चा आहे.

Chetan Patilhttps://www.mymahanagar.com/author/chetan/
writer, poet, journalist, copy writer, theater artist
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -