एकाही प्रकल्पाला स्थगिती नाही; उद्धव ठाकरेंची ग्वाही

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

Mumbai
uddhav thackeray take charge as chief minister of maharashtra
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यातील प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी मंत्रालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ तसेच मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन यासारख्या विभागाकडून सादरीकरण करण्यात आले. तब्बल चार तास नॉन स्टॉप ही आढावा बैठक सुरू होती. कोणत्याही प्रकल्पाला स्थगिती देण्यात आलेली नाही. तसेच बुलेट ट्रेनबाबतचा कोणताही निर्णय झाला नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. विकास कामे पूर्ण करताना प्राधान्यक्रम ठरवावा. तसेच सामान्य जनतेला या प्रकल्पांचा लाभ घेता यावा म्हणून ही आढावा बैठक बोलावण्यात आली होती, असे उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितले.

पायाभूत सुविधा प्रकल्पाच्या कामांना स्थगिती देण्यात आलेली नाही. पण आरे कारशेडचे काम थांबवण्याच आदेश दोन दिवसांपूर्वीच देण्यात आले होते, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. राज्यातील कोणत्याही विकास प्रकल्पांना स्थगिती देण्यात आलेली नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. भीमा-कोरेगावबद्दल गंभीर नसलेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश आधीच्या सरकारने दिले होते. त्याची अंमलबजावणी झाली की नाही, याची आम्ही पडताळणी करत आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

आजच्या बैठकीमध्ये राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्प जलदगतीने पूर्ण करून नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्याचा सूर होता. तसेच नव्या सरकारच्या माध्यमातून पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी लागणारा आवश्यक निधीही पुरवण्यात येईल असे सांगण्यात आले.

आजच्या बैठकीत मुंबई मेट्रो, नवी मुंबई विमानतळ, समृद्धी महामार्ग, एमटीएचएल या कामांबद्दल सादरीकरण करण्यात आले. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, छगन भुजबळ, जयंत पाटील यांच्यासह मुख्य सचिव अजोय मेहता, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पायाभूत सुविधा प्रकल्पांना गरज लागली तर सरकार मदत करणार अशी भूमिका घेतली असल्याचे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी सांगितले. राज्य सरकार कोणताही पायाभूत सुविधा प्रकल्प बंद करणार नाही, तर नागरिकांसाठी लवकरात लवकर या प्रकल्पांची पुर्तता व्हावी यासाठीचे प्रयत्न होतील असेही त्यांनी सांगितले.

राज्य सरकार हे पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी सकारात्मक आहे. माध्यमांमध्ये विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी येणार्‍या बातम्या या चुकीच्या असून आजची बैठक अतिशय सकारात्मक झाली. राज्य सरकार पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी सकारात्मक आहे हेच आजच्या बैठकीतून जाणवले अशी माहिती एका वरिष्ठ सनदी अधिकार्‍याने दिली. राज्यातील बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्ग तसेच मेट्रो प्रकल्पाला ब्रेक लागण्याच्या बातम्या काही दिवसांपासून येत होत्या. पण आजच्या बैठकीनंतर बरंच चित्र स्पष्ट झाले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here