मुंबई व पुण्यातील नागरिकांना १४ दिवसाचा होम क्वारटाईन आवश्यक

मुंबई आणि पुण्यात करोनाचे जास्त रुग्ण असल्याने तेथील नागरिकांनी गावी येऊ नये असे आवाहन अनेक ठिकाणी केले जात आहे.

Mumbai

करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हा पातळीवरही प्रयत्न सुरु आहेत. मुंबई आणि पुण्यात करोनाचे जास्त रुग्ण असल्याने तेथील नागरिकांनी गावी येऊ नये असे आवाहन अनेक ठिकाणी केले जात आहे. दरम्यान वर्ध्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मुंबई, पुण्यातून येणाऱ्यांना १४ दिवस होम क्वारंटाइन केले जाणार असल्याचे म्हटले आहे. यासाठी मुंबई, पुण्याहून येणाऱ्या लोकांची माहिती द्या असे आवाहनही करण्यात आले आहे. मुंबई, पुण्याहून येणाऱ्या नागरिकांची माहिती अधिकाऱ्यांना दिली जावी. तेथून येणाऱ्या नागरिकांना १४ दिवस होम क्वारंटाइन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा लोकांची माहिती दिल्यास तात्काळ प्रक्रियेला सुरुवात करता येईल असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

आतापर्यंत करोनाबाधित क्षेत्रातून १०९ व्यक्ती वर्धा जिल्ह्यात आल्या असल्याची नोंद आरोग्य यंत्रणेने घेतली आहे. त्यापैकी ७४ जणांना विलगीकरण केल्यानंतर सुटका करण्यात आली आहे. तर ३५ जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं असून त्यांच्यावर आरोग्य विभागाची नजर आहे. तसंच प्रत्येक जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानदाराने आपल्या दुकानासमोर गर्दी होऊ नये यासाठी एकेक मीटरचे चुन्याने बॉक्स काढावे. दुकानात येणार्‍या ग्राहकांना एका बॉक्समध्ये एक अशा पद्धतीने उभं करून प्रथम आलेल्यांना प्रथम प्राधान्य याप्रकारे साहित्य द्यावे. यामुळे एक मीटर अंतर राखण्यात मदत होईल असा आदेशही जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे.

उपाययोजनेचे पालन न केल्यास गुन्हा दाखल

अत्यावश्यक सुविधा अंतर्गत सुरु असलेल्या सर्व दुकानांनी ही उपाययोजना करणे आवश्यक आहे. ही उपाययोजना न केल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे असं बजावण्यात आलं आहे. सायंकाळी पाच वाजल्यानंतर ते सकाळी सात वाजेपर्यंत संचारबंदी म्हणजे कर्फ्यू असणार आहे. त्या दरम्यान औषधांची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद राहतील, कोणत्याही कारणाशिवाय कोणत्याही नागरिकांनी रस्त्यावर फिरू नये व शासनाच्या आदेशाचे पालन करावे. सायंकाळी पाच वाजल्यानंतर कुणीही व्यक्ती अथवा ग्रुपने दिसून आल्यास जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडून सक्तीची कारवाई करण्यात येईल असंही यावेळी सांगण्यात आलं आहे.

कोकणातही मुंबई व पुण्यातील नागरिकांना प्रवेश बंदी

मुंबई व पुणे येथे करोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आल्यामुळे बरेचशे नागरिक कोकणात येऊ लागले आहे. खेडे गावात करोनाचा फैलाव जास्त नसल्यामुळे गावातील लोक बाहेरील नागरिकांना प्रवेश नाकारत आहेत. तसेच काही गावात मुंबई व पुण्यातून आलेल्या नागरिकांची माहिती नोंदवत आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here