सफाई कामगारांचा दिवाळीनिमित्त सत्कार

mumbai
सफाई कामगारांचा सत्कार करताना

आपली मुले शिकली पाहिजेत. त्यासाठी त्यांनी वाचले पाहिजे. जिजाऊ ग्रंथालयाने जी संधी उपलब्ध करून दिली आहे त्याचा फायदा आपल्या मुलांनी घ्यावा. मुले शिकली तरच आपण करत असलेले काम त्यांच्या हातून सुटेल व ती चांगल्या हुद्यावर काम करतील,’ असे प्रतिपादन उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे यांनी केले. शिवस्फूर्ती प्रतिष्ठान व जिजाऊ ग्रंथालय आयोजित जिजाऊ ग्रंथालय वर्धापनदिनानिमित्त वाचक मेळावा व पुणे मनपा सफाई कामगारांचा सत्कार समारंभ धनत्रयोदशी दिनी संपन्न झाला. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे बहुजनांची स्थिती बदलू लागली. इतर गोष्टीत गुंतण्यापेक्षा यांचे विचार आपण वाचले पाहिजेत.’ , असे धेंडे यांनी सांगितले.

आपले ‘रियल हिरो : सफाई कामगार..करूया त्यांचा सन्मान’ अशी भावना मनात ठेवून गेल्या ६ वर्षांपासून हा उपक्रम शिवस्फूर्ती प्रतिष्ठान व जिजाऊ ग्रंथालय आयोजित करत आहे. महिलांना साडी-चोळी, पुरूष कर्मचार्‍यांना शर्ट-पॅन्टपीस व दिवाळी फराळाचे वाटप करून प्रतिवर्षी कृतज्ञता व्यक्त केली जाते. सुमारे ६५ कामगारांचा सत्कार पुण्याचे उपमहापौर मा. डॉ. सिध्दार्थ धेंडे, उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक, चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव, कस्तुरबा सोसायटीचे सेक्रेटरी विष्णू आगरवाल, संचालक अनिल यादव यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला पूर्वल खरात यांनी ‘कामगारांचे जीवन’ या विषयावर कविता सादर केली. सर्व उपस्थित श्रमिकांनी व कष्टकर्‍यांनी याला दाद दिली. तसेच स्वराज चॉकलेटचे संचालक अनिल ढगे यांच्यावतीने सर्व कामगारांना चॉकलेटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संस्थेच्या सर्व उपक्रमांची माहिती अध्यक्षा शैलेजा मोळक यांनी दिली. सूत्रसंचालन प्रज्ञेश मोळक व आभारप्रदर्शन कैलास वडघुले यांनी केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here