घरमहाराष्ट्रइंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अकोलेत कडकडीत बंद

इंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अकोलेत कडकडीत बंद

Subscribe

चौकाचौकात ज्ञानोबा-तुकोबांचा गजर , तृप्ती देसाईंच्या वक्तव्याचा निषेध

इंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ रविवारी (दि.२३) अकोले शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदमध्ये गावकर्‍यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत महाराजांना पाठिंबा दिला. अकोले तालुक्यातील सर्वच गावे या बंदमध्ये सहभागी झाले होते. इंदोरी गावातून निघालेल्या मोटारसायकल रॅलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. महाराजांच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या मोर्चात अकोले शहर ज्ञानोबा तुकोबांच्या गजराने दुमदुमुन गेले होते. यावेळी महाराजांची बदनामी थांबवण्याची मागणी करण्यात आली.

तालुक्यातील शंभरहून अधिक गावांनी ग्रामसभेत केलेले ठराव यावेळी प्रशासनाला देण्यात आले. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर पीसीएनडीटी कायद्यानुुसार त्यांना नोटीस बजावण्यात आली. निवृत्ती महाराज इंदुरीकरांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करत या नोटिसीला उत्तरही देण्यात आले. मात्र, याचदरम्यान भूमाता बिग्रेडच्या तृप्ती देसाई यांनी अकोल्यात येवून इंदुरीकरांना काळे फासण्याचा इशारा दिल्यानंतर अकोले तालुक्यातील ग्रामस्थ आक्रमक झाले व त्यांनी अकोले बंदचा इशारा दिला.

- Advertisement -

त्यानुसार रविवारी सकाळपासून अकोले तालुक्यात कडकडीत बंद ठेवण्यात आला. सकाळी ९ वाजता इंदुरीकरांच्या इंदोरी या मूळ गावातून बाईक रॅली काढत युवकांनी पाठिंबा दर्शवला. या रॅलीत इंदुरीकर महाराजांना मानणारा मोठा वर्ग सहभागी झाला होता.

‘आम्ही इंदुरीकरांचे समर्थक’ असे बॅनर घेतलेले लोक रॅलीमध्ये दिसत होते. इंदोरी, सुगाव, कळसमार्गे काढण्यात आलेल्या रॅलीची सांगता शहरातील महात्मा फुले चौकात करण्यात आली व नंतर निषेध मोर्चाला सुरूवात झाली. महात्मा फुले चौकातून निघालेला हा मोर्चा एखाद्या दिंडीप्रमाणे दिसत होता. वारकरी संप्रदायासह सर्वच पक्षातील कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. ज्ञानोबा तुकोबांच्या गजरात हाती टाळ मृदंग घेत आबालवृध्द यात सहभागी झाले होते. यानंतर बाजार तळावर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.

- Advertisement -

बेताल वक्तव्य करणार्‍या तृप्ती देसाई विरोधात कारवाई करावी, देसाई यांनी महाराजांची जाहीर माफी मागावी, अशी प्रमुख मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी भाजप नेते मधुकर पिचड, राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे, अशोक भांगरे, माजी आमदार वैभव पिचड यांच्यासह वारकरी संप्रदाय मोठ्या संख्येने उपस्थित होते. योगी केशवबाबा, आमदार किरण लहामटे, मधुकर नवले, स्मिता अष्टेकर, योगी केशव चौधरी, अशोक भांगरे, सीताराम गायकर, शिवाजी धुमाळ, जालिंदर वाकचौरे, गिरजाजी जाधव, वकील के.डी. धुमाळ, मच्छिंद्र धुमाळ, वसंत मनकर, मारुती मेंगाळ, महेश नवले, अमित भांगरे, सतिष भांगरे, मंदाबाई नवले, विवेक महाराज केदार, फरगडे महाराज यांसह वारकरी संप्रदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता.

नादी लागू नका..
निवृत्ती महाराजांच्या नादी लागू नको. ही अकोलेची माता आहे, असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या इंदुमती वाकचौरे यांनी यावेळी दिला. तर, अकोल्यातील सर्व महिलांमध्ये मला आज स्मिता अष्टेकर दिसतात. या तालुक्यातील सर्व महिला वाघिणी आहेत, असे अष्टेकर म्हणाल्या.

गाडगे महाराजांनी समाजाचे मतपरिवर्तन केले. स्वच्छतेचा मंत्र देणार्‍या गाडगेबाबांच्या पावलावर पाऊल ठेवत इंदुरीकर महाराज समाज प्रबोधनाचे काम करत आहेत. त्यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू नये.
– मधुकर पिचड, भाजप नेते

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -