एसी बंद करा, खिडक्या उघडा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे जनतेला आवाहन

Mumbai
uddhav thackeray

करोनाशी युद्ध घरात बसूनच करायचे आहे. मात्र त्यासाठी घरातील एसी बंद करा, खिडक्या उघडा आणि घरात मोकळी हवा येऊ द्या, चला हवा येऊ द्या, असे आवाहन करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुढी पाडवा जरूर साजरा करा, मात्र या संकटावर मात करून आपण सर्वांनीच गुढी उभारू, असा विश्वासही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री ठाकरे यांनी गुढीपाडव्याला व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे बुधवारी राज्यातील जनतेशी संवाद साधला. ते म्हणाले की,१९७१च्या युद्धा सारखच हे युद्ध आहे. फक्त यावेळी शत्रू समोर दिसत नाही. एरव्ही शत्रू समोर असतो, तेव्हा लढायला सोपं जातं. मात्र करोना नावाचा हा शत्रू दिसत नाही.

तो कुठून हल्ला करेल याची काहीच कल्पना नसते. त्यामुळे त्याच्याशी गनिमीकाव्यानेच लढलं पाहिजे. त्यासाठी आपण घरात राहिलं पाहिजे. घराबाहेर पडला की शत्रू घरात पाऊल टाकेल, त्यामुळे घरात राहा.

काल रात्री तुमची गोंधळाची परिस्थिती झाली होती. तुमची पळापळ झाली. त्यामुळे मी सकाळी तुमच्यासमोर आलो असतो तर पुन्हा तुम्ही घाबरला असता, म्हणून दुपारी आलो. पण मी तुम्हाला नकारात्मक काहीच सांगणार नाही. तर तुम्हाला गुढी पाडव्याच्या शुभेच्छा द्यायला आलो आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. केंद्राने काही सूचना केल्या आहेत. त्यांनी शक्यतोवर एसी बंद करायला सांगितले आहे. गारव्यासाठी एसी सुरू करू नका. त्यामुळे मॉइश्चरायजर येतं. करोनाला पोषक वातावरण तयार होतं. तुम्ही तुमच्या घरातील एसी बंद करा.

खिडक्या उघडा. घरात मोकळी हवा येऊ द्या… हवा येऊ द्या… चला हवा येऊ द्या. मोकळा श्वास घ्या, असेही ते म्हणाले. आपण गुढी पाडवा अत्यंत जल्लोषात आणि उत्साहात साजरा करतो. यंदा आपल्याला गुढी पाडवा असा जल्लोषात साजरा करता आलेला नाही. आज आपण शांत आहोत. गुढी पाडवा तर आपल्याला साजरा करायचा आहे. पण आज नाही. हे युद्ध जिंकल्यानंतर आपण गुढी पाडवा साजरा करू. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. आपल्याला युद्ध जिंकायचेच आहे. या संकटावर मात करूनच आपण विजयाची गुढी उभारूया, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

पगार कापू नका
ज्यांचे तळहातावर पोट आहे. त्यांना किमान वेतन द्या. त्यांचा पगार कापू नका. माणूसकीच्या धर्माने वागा, या कर्मचारी वर्गाचे किमान वेतन थांबवू नका. ते थांबवले तर दुसरे संकट आपल्यासमोर येईल. हे संकट येऊ देऊ नका, असे कळकळीचं आवाहन मी उद्योगांच्या मालकांना करतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.

दुकानांमध्ये झुंबड नको
आपल्याकडे अन्नधान्याचा पुरेसा साठा आहे. जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पडणार नाही. एवढंच काय पशूखाद्यही उपलब्ध आहेत. वाड्या वस्त्यातील दवाखाने, दुकाने सुरू राहतील. भाजीपाल्याची दुकानं बंद राहणार नाही. दुकानांमध्ये उगाच झुंबड करू नका.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here