घरमहाराष्ट्रमुख्यमंत्री मातोश्रीत, मंत्रालय झूमवर आणि अजितदादांच्‍या जोरबैठका सुरू!

मुख्यमंत्री मातोश्रीत, मंत्रालय झूमवर आणि अजितदादांच्‍या जोरबैठका सुरू!

Subscribe

अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी मैदानात उतरून कोरोनाशी दोन हात करत असताना तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारचा कारभार सध्या तीन दिशेला सुरू असल्याचे दिसून आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीतून कारभार हाकत आहेत तर मंत्रालयात प्रशासकीय अधिकारी ‘झूम’ बैठकांत व्यस्त आहेत. यावेळी मात्र उपमुख्यमंत्री अजित पवारच दिवसभर मंत्रालयात बसून राज्याचा कारभार सहाव्या मजल्यावरून हाकताना दिसताहेत. दादांच्या रोजच्या जोर-बैठकांमुळे हे सरकार कार्यरत असल्याचे दिसत असून बाकी कारभार रामभरोसे सुरू आहे. महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे हे दृश्य, शरद पवार अदृश्य तर अजित पवार हे प्रत्यक्ष असे तीन मुख्यमंत्री सध्या कार्यरत असल्याची चर्चा मंत्रालयात आहे.

- Advertisement -

कोरोनाच्या महामारीमुळे देशाचे प्रमुख अर्थचक्र असलेल्या महाराष्ट्राचा कारभार ठप्प झाला आहे. यातच आर्थिक राजधानी मुंबईत ‘मिशन बिगिन अगेन’ सार्थकी लागून महाराष्ट्राला उभारी देईल, अशी आशा वाटत होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तशी घोषणा करून वातावरणनिर्मिती केली खरी, पण या घडीला ठाकरे सरकारचा कारभार बघता या सरकारची तीन तोंडे, तीन दिशेला दिसत आहेत. त्यामुळे याचा मोठा परिणाम राज्याच्या कारभारावर झाला असल्याचे समोर येत आहे. २२ मार्चला लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर मागील १०० दिवसांत सुमारे १२हून अधिक कॅबिनेट बैठका झाल्या आहेत.

मात्र, सह्याद्रीवरील नाममात्र बैठकांचा अपवाद वगळता मुख्यमंत्री ठाकरे मंत्रिमंडळाच्या बैठकांना हजर न राहता मातोश्रीवरून व्हिडिओकॉन्फरन्सद्वारे मंत्रिमंडळ बैठकीत सहभागी होतात. हे कमी म्हणून की काय विरोधीपक्षांच्या बोलावलेल्या बैठकीलाही मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर असूनही हाकेच्या अंतरावर असलेल्या मंत्रालयात आले नव्हते. ८ जुलैच्या मंत्रिमंडळ बैठकीलाही मुख्यमंत्री मंत्रालयात हजर नव्हते.

- Advertisement -

कोरोनाच्या या काळात उद्धव ठाकरे हे मंत्रालयात ठाण मांडून कारभार हाकण्याऐवजी मातोश्रीवरून ‘फेसबूक लाईव्ह’ द्वारे राज्याच्या जनतेला संयमाचे धडे देत आहेत, अशी कुजबुज आता ठाकरे सरकारच्या मंत्र्यांमध्येही ऐकायला मिळते. महत्त्वाच्या काही बैठका असल्यास वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत ‘झूम’वर चर्चा करून निर्णय घेतात. रोज झूमवर चार ते पाच बैठका होतात. त्यामुळे बुधवार आणि गुरुवार अनेक सनदी अधिकारी झूमवर व्यस्त होते. मात्र, मंत्रालयात जाऊन कारभार हाकण्याऐवजी मातोश्रीवर बसून राज्यशकट चालवण्याकडे उद्धव यांचा कल आहे.

काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असल्यास तिन्ही पक्षांचे नेते आणि मंत्री मातोश्रीवर जाऊन उद्धव यांना भेटत आहेत. पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या, दोन किलोमीटरच्या परिघाबाहेर लोकांना न सोडण्याचा निर्णय, जप्त केलेली वाहने, सनदी अधिकार्‍यांची मनमानी आणि काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना विश्वासात न घेता घेतलेले निर्णय यामुळे महविकास आघाडीत गेल्या काही दिवसांत धुमशान सुरू आहेे. शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी स्वतः पुढाकार घेऊन हे धुमशान तात्पुरते तरी थांबवले आहे.

हा सगळा गोंधळ सुरू असताना अजित पवार मात्र दररोज न चुकता मंत्रालयात सहाव्या मजल्यावर येऊन आपल्या नेहमीच्या कार्यशैलीने वेगवान कारभार करताना दिसतात. उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात मोठ्या संख्येने मंत्री, नेते,आमदार आणि सनदी अधिकारी दिसत असून सकाळी सुरु झालेले दादांचे काम संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू असते. मुख्य म्हणजे लोकही दादांना भेटून आपले प्रश्न सोडवून घेतात. मंत्रालयात नऊच्या सुमारास येऊन ते कारभार चालवत आहेत. सोशल डिस्टन्सिंग, जागोजागी सॅनेटायजरने भेटायला आलेल्या प्रत्येकाचे काम तडीला नेण्यासाठी संबंधितांना फोनवरुन आदेश देताना दादा बुधवारी आणि गुरुवारी मंत्रालयात दिसत होते.

सारथीची सुत्रेही अजित पवारांकडे

मराठा संघटनांच्या आक्रमक पवित्र्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या ’सारथी’ संस्थेची सूत्रे आता खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच हातात घेतली आहेत. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली. ‘सारथी’च्या अनुषंगाने विरोधकांसह काही संघटनांनी वडेट्टीवारांनाही लक्ष्य केले होते. त्यामुळे त्रस्त झालेल्या वडेट्टीवारांनी मी ओबीसी असल्यामुळे मला लक्ष केले जात असल्याचा आरोप केला होता. तसेच, मुख्यमंत्र्यांना सांगून हा विभाग एखाद्या मराठा मंत्र्याकडे देण्याची तयारीही त्यांनी दाखवली. त्यावर मराठा आणि ओबीसींमध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न करू नका, असा इशारा खासदार संभाजीराजेंनी दिल्यानंतर गुरूवारी बैठक आयोजिली होती.

सारथीला आठ कोटींचा निधी

मागील काही दिवसांपासून राज्यातील चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या सारथी संदर्भात राज्य सरकारने गुरुवारी मोठा निर्णय घेतला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तात्काळ आठ कोटींचा निधी देणार असल्याची माहिती पवार यांनी दिली. सारथी बंद होणार नाही. सारथी संस्था नियोजन विभागाच्या अधिकारात घेतली जाणार असेही उपमुख्यमंत्री म्हणाले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे केवळ चार तासातच सरकारी आदेश निघून आठ कोटींचा निधी बैठकीच्याच दिवशी सारथीला देण्यात आला. त्यामुळे यापूर्वी अनेकांनी आश्वासने दिली मात्र अजितदादांनी करून दाखवले अशी सर्वत्र चर्चा गुरूवारी मंत्रालयात सुरू होती.

मराठा समाजातील मुलांच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी सारथी संस्था सुरू करण्यात आली होती. मात्र, मागील काही दिवसांपासून विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, स्वायत्ता आणि गैरव्यवहारावरून ही संस्था चर्चेत आहे. यावरून राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली होती. त्यामुळे हा वाद चिघळला होता.

या वादात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हस्तक्षेप करत बैठक बोलावली होती. या बैठकीली छत्रपती संभाजीराजे भोसले, विजय वडेट्टीवार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. याबैठकीत संस्थेच्या विविध समस्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. त्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. सारथी संस्था बंद होणार नाही. मागील काही काळात गैरसमज निर्माण झाले होते. त्यामुळे मराठा समाजातील तरुणांमध्ये चुकीचा मेसेज गेला होता. मात्र, हे होणार नाही. सारथी संस्था नियोजन विभागाच्या अखत्यारित घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे विनंती करण्यात येईल. त्याचबरोबर सारथीला उद्याच विजय वडेट्टीवार हे आठ कोटी रुपयांची मदत देतील, असं अजित पवार म्हणाले.

माझ्या हॉलमध्ये सगळी लोकं बसू शकत नाही. त्यामुळे हॉलमध्ये गेलो होतो. पण, चांगला निर्णय घेणे महत्त्वाचे की त्याला वेगळे फाटे फोडायचे हे बघा. दर दोन महिन्यांनी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली जाईल. सारथी संस्था चांगल्या पद्धतीनं काम करेल. आजच्या बैठकीत त्या अनुषंगाने सकारात्मक चर्चा झाली आहे. सारथी संस्थेनं केलेला सगळा खर्च संस्थेच्या संकेतस्थळावर देण्याची सूचना केली आहे, असे अजित पवार म्हणाले.

संभाजीराजे तिसर्‍या रांगेत सारथीच्या बैठकीत गोंधळ

मराठा समाजाच्या विकासासाठी मंत्रालयात सातव्या मजल्यावर आयोजित करण्यात आलेल्या सारथी संस्थेच्या बैठकीत गुरूवारी सकाळी गोंधळ झाला. खासदार संभाजीराजे छत्रपती यांना तिसर्‍या रांगेत स्थान देण्यात आल्याने मराठा समाजाच्या समन्वयकांनी आक्षेप नोंदवला. मात्र, संभाजीराजे यांनी अत्यंत शांतपणे परिस्थिती हाताळत सामंजस्याची भूमिका घेतली. या वादात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यस्थी करत तुम्हाला वाद मिटवायचे आहेत की वाढवायचे आहेत असे म्हटल्यानंतर बैठकीत झालेला गोंधळ मिटला. नंतर उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीची जागा बदलत वादावर तोडगा काढत संभाजीराजेंना आपल्याजवळ बसवले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -