पारदर्शक मुख्यमंत्र्यांनी पारदर्शकपणे सगळं सांगितलं पाहिजे – सुप्रिया सुळे

महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना राष्ट्रवादी काँग्रेसने ५० लाखांच्या मदतीचा धनादेश दिल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

Mumbai
Supriya Sule
राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे

“पारदर्शक’ हा मुख्यमंत्र्यांचा लाडका शब्द आहे, त्यामुळे पुरग्रस्त जिल्हयात काय परिस्थिती आहे? हे त्यांनी पारदर्शकपणे सगळ्यांना सांगण्याची गरज आहे”, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंत्रालयातील वार्ताहर कक्षात पत्रकारांशी संवाद साधताना लगावला. पुरग्रस्त भागातील जिल्हयात सध्या मदतीची गरज आहे आणि याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही सुळे यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने आज मुख्यमंत्र्यांकडे पूरग्रस्त मदत निधीचा सुमारे ५० लाखाचा धनादेश देण्यात आला. शिवाय पुरग्रस्तांचे तात्काळ पुनर्वसन करण्यात यावे याबाबतच्या २५ विविध मागण्यांचे निवेदनही देण्यात आले.

पुरग्रस्तांना तातडीची मदत पोचवणं, त्यांना औषधांचा साठा देणं आणि त्यांची घरं तात्काळ कशी उभी करता येतील. हे पाहणं गरजेचं आहे. हे भावनिक विषय आहेत. नुसतं घर दिलं, बिस्किटचा पुडा दिला की आपली जबाबदारी संपणार नाही. आपल्याला तिथे सगळ्यांना जावून त्यांना त्यांच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी आपली आहे, असेही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

शरद पवार यांनी मुख्यमंत्री असताना लातूरला भूकंप झाला होता. त्यावेळी सलग १५ दिवस प्रशासनाला सोबत घेवून ते मदतकार्य करत होते, अशी आठवणही सुळे यांनी करुन दिली. जेव्हा असे दुर्दैवी प्रसंग घडतात, त्यावेळी तिथे जावून ठाण मांडून बसावे लागते आणि लोकांना वेळ द्यावा लागतो. शरद पवार आजही कराडला जात आहेत. आमचे सगळे नेते विशेषतः अजित पवार, धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, हसन मुश्रीफ आदींसह सगळेच नेते फिल्डवर जावून झटून काम करत आहेत, याचा मला सार्थ अभिमान असल्याचेही सुळे यांनी यावेळी सांगितले.