घरमहाराष्ट्रजुन्नरच्या विकासासाठी दाऱ्या घाटाचा आराखडा तयार करणार - मुख्यमंत्री

जुन्नरच्या विकासासाठी दाऱ्या घाटाचा आराखडा तयार करणार – मुख्यमंत्री

Subscribe

'जुन्नर तालुक्याचा विकास व्हावा, यासाठी दाऱ्या घाटाचा आराखडा तयार करु', असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

‘जुन्नर तालुक्यातील दाऱ्या घाटाचे सर्वेक्षण करून बोगद्याच्या माध्यमातून जुन्नर हे मुंबईच्या जवळ आणण्यासाठी आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसराचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल’, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुन्नर तालुक्यातील ओझर येथे केले. हायब्रीड ॲन्युईटी अंतर्गत २८० कोटी रुपयांच्या अष्टविनायक रस्त्यांच्या विकास कामांचा शुभारंभ आज ओझर येथे करण्यात आला. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘जुन्नर तालुक्यात मोठी अर्थव्यवस्था निर्माण होऊन वन्य प्राण्यांच्या संख्येत वाढ होईल, त्यासाठी आंबेगव्हाण येथे बिबट सफारीसाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. जुन्नर तालुका पर्यटन तालुका घोषित करण्यात आला आहे. यासाठी आराखडा तयार करण्यात येईल. तालुक्यातील बुडीत बंधाऱ्याला मान्यता देण्यास प्राधान्य देण्यात येईल. अष्टविनायक हे आपले वैभव आहे. अष्टविनायकाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी विकास आराखडा तयार करण्यात आला असून त्यानुसार परिसरातील रस्त्यांचा विकास करण्यात येणार आहे. यामुळे पर्यटकांना चांगल्या दर्जाच्या सुविधा मिळतील.’

- Advertisement -

‘विकास कामांना मान्यता द्या’

या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवनेरी भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. ओझर गणपती मंदिर ट्रस्टतर्फे एक लाख रुपये मदतीचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला. तसेच पुरस्कार्थी राहुल बनकर यांच्यातर्फे दहा हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीस देण्यात आला. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि आमदार शरद सोनवणे यांनी तालुक्याच्या विकासास सहाय्यभूत ठरणाऱ्या विकास कामांना मान्यता द्यावी, अशी विनंती केली. पत्रकार उदय निरगुडकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरवात गणेश पूजन आणि शिवप्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -