घरमहाराष्ट्र'सुपारी घेऊ नका, दुपारी घरी बसा'; मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना टोला

‘सुपारी घेऊ नका, दुपारी घरी बसा’; मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना टोला

Subscribe

कोल्हापुरात झालेल्या महायुतीच्या पहिल्या प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार तोफ डागली.

‘काही लोक स्वत: बोलू शकत नाहीत, म्हणून पोपट नेमू लागले आहेत. बारामतीने पोपट नेमला आणि तो बोलू लागला. पण आमचे कपडे कुणीही उतरवू शकत नाही. विधानसभेच्या निवडणुकीत, महापालिकेच्या निवडणुकीत तुमचे कपडे आम्ही उतरवले. मुंबईत लंगोट शिल्लक होती. पण उद्धवजींनी तीदेखील उतरवली. त्यामुळे कुणाची सुपारी घेऊन बोलण्यापेक्षा दुपारी घरी बसा आणि मोदींना पंतप्रधान होताना पाहा’, असा खोचक सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना दिला आहे. कोल्हापुरातून आज युतीने प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी युतीतल्या सर्वच नेत्यांनी आघाडीवर सडकून टीका केली.

‘यांच्या कॅप्टननंच माघार घेतली’

यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. ‘यांच्या कॅप्टननंच माढ्यातून माघार घेत १२वा खेळाडू म्हणून खेळायचं कबूल केलं आहे.आम्हाला कदाचित उसातलं कळत नाही, पण जाणत्या राजाने जेवढे निर्णय उस कारखानदार आणि शेतकऱ्यांसाठी घेतले नाही, तेवढे मोदी सरकारने घेतले आहेत. आम्हाला साखर सम्राटांचं भलं करायचं नव्हतं. आमच्या कार्यकाळात एफआरपीसाठी कुणाला आंदोलन करावं लागलं नाही’, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. तसेच, ‘मी काँग्रेस-राष्ट्रवादीला खुलं आव्हान देतो. तुमचे १५ वर्षांचे आकडे घेऊन या आणि आमचे ४ वर्षांचे आकडे घेऊन या. तुमच्या १५ वर्षांपेक्षा आम्ही जास्त काम केलं. या पश्चिम महाराष्ट्राने राज्याला भरभरून दिलं. त्यांचे मंत्री झाले. पण प.महाराष्ट्राचा विकास झाला नाही’, असं देखील ते म्हणाले.

- Advertisement -

‘देश चालवायला ५६ पक्ष नव्हे, ५६ इंचाची छाती हवी’

दरम्यान, यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत अनेक पक्षांनी केलेल्या आघाडीवर देखील मुख्यमंत्र्यांनी तोंडसुख घेतलं. ‘आमची युती झाली, पण त्यांचं काय चाललंय त्यांनाच माहीत नाही. ५६ पक्ष एकत्र आले म्हणे. पण मला त्यांना विचारायचंय की ५६ रजिस्टर्ड पक्ष तरी आहेत का इथे? कुणीही रस्त्यावर भेटलं आणि त्याला मंचावर बसवलं. ५६ पक्षांवर देश चालत नाही, त्याला ५६ इंचाची छाती लागते. सेना-भाजप युती फेविकॉल का जोड है. ही युती सत्तेसाठी नसून विचारांची युती आहे. होय आम्हाला अभिमान आहे की आम्ही हिंदुत्ववादी आहोत’, असं ते म्हणाले.

‘तुमची भ्रष्टाचार मॅनेजमेंट कंपनी आहे का?’

भाजप इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी असल्याच्या विरोधकांच्या टीकेचा यावेळी मुख्यमंत्र्यांनी समाचार घेतला. ‘आम्ही इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहोत तर तुम्ही काय भ्रष्टाचार मॅनेजमेंट कंपनी आहात का? जेवढ्या लोकांनी पैसा खाल्ला, त्यांच्या तोंडून तो ओकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही’, असं ते म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी काँग्रेससोबत गेलेल्या राजू शेट्टींवरही टीका केली. ‘काही लोकं काल-परवापर्यंत ज्यांना शिव्या द्यायचे, ते आता त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसले आहेत. आता तर एक युवा चेहरा आम्ही हातकणंगलेमध्ये दिला आहे. त्यांना सदाभाऊ खोतच काफी आहेत. पश्चिम महाराष्ट्रातला सामना १०-०च्या फरकाने शिवसेना-भाजप जिंकणार’, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -