मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शपथविधीनंतर पहिल्यांदाच ‘हे’ घडणार!

Mumbai
uddhav thackeray took charge as chief minister of maharashtra ३

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर आणि मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार आहेत. पाच वर्षे भाजप सोबत सत्तेत राहिलेल्या शिवसेनेने विधानसभा निवडणुकीनंतर भाजपची फारकत घेतली. नुसती फारकतच घेतली नाही तर भिन्न विचारसरणी असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये शाब्दिक चकमक नेहमीच पहायला मिळत आहे. मात्र, आता खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दिल्लीत जाऊन मोदींना भेटणार आहेत. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.

ही सदिच्छा भेट

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोदींना भेटणार यावरून उलट सुलट चर्चा सुरू असताना शिवसेनेचे राज्यसभा खासदार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करत ही फक्त सदिच्छा भेट असल्याचे सांगितले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दिल्ली येथे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेत आहेत. ‘ही फक्त सदिच्छा भेट आहे बाकी तपशिलात शिरण्याची गरज नाही’, असे संजय राऊत या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलीच भेट

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पहिल्यांदाच भेटत आहेत. याआधी भाजप सोबत असताना नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बऱ्याच भेटी झाल्या असल्या, तरी उद्याच्या दिल्ली भेटीला महत्व प्राप्त झाले आहे.