‘आंदोलन भडकवणाऱ्यांनी कायदे समजून घ्यावेत’; मुख्यमंत्र्यांची दिल्लीत भूमिका!

New Delhi
Uddhav Thackeray
आरोग्‍य यंत्रणेवर लक्ष केंद्रीत करा; मुख्यमंत्र्यांच्या विभागीय आयुक्तांना सुचना

राज्यात भाजपसोबत २५ वर्षांची युती तुटल्यानंतर आणि स्वत: मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंनी दिल्लीत दाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीमध्ये नक्की कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार किंवा झाली असेल, यावर मोठी चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू होती. पुत्र आदित्य ठाकरेसोबत मुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदींची भेट घेतली. या पार्श्वभूमीवर नक्की चर्चा काय झाली? याची सगळ्यांना उत्सुकता झाली. अखेर भेटीनंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन चर्चेविषयी माहिती दिली. यावेळी सीएए, एनआरसी आणि एनपीआरविषयीच्या चर्चेविषयी पत्रकारांनी विचारल्यावर, ‘दिल्ली किंवा इतर ठिकाणी सीएए, एनआरसी आणि एनपीआरविरोधात सुरू असलेली आंदोलनं जे लोकं भडकावत आहेत, त्यांनी आधी कायदा किंवा त्यातली कलमं काय आहेत, ते समजून घ्यावं’, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहे. या पार्श्वभूमीवर आता काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या टोकाच्या विरोधी भूमिकेसमोर मुख्यमंत्री आपली भूमिका कशी पटवून देणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री सीएए आंदोलनावर?

‘सीएए, एनपीआर, एनआरसीच्या मुद्द्यांवर माझी पंतप्रधानांसोबत चर्चा झाली. या मुद्द्यांवर मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. ‘सामना’मध्ये मी ती मांडली आहे. सीएएवर कुणालाही घाबरण्याचं कारण नाही. हा देशातून कुणाला काढण्यासाठी आणलेला कायदा नाही. इतर देशातल्या अल्पसंख्यांना इथलं नागरिकत्व देण्याचा मुद्दा आहे. एनआरसी पूर्ण देशात लागू केला जाणार नाही हे सरकारने स्पष्ट केलं आहे. मी नागरिकांना आश्वासन दिलंय की कुणाचंही नागरिकत्व हिसकावलं जाणार नाही. एनआरसीबद्दल जे वातावरण तयार केलं जातंय, की मुसलमानांनाच त्रास होणार, ते चुकीचं आहे. सगळ्यांनाच आपल्या नागरिकत्वासाठी रांगेत उभं राहावं लागणार आहे. या मुद्द्यावरून सुरू असलेल्या आंदोलनामध्ये ज्या लोकांनी आंदोलन भडकावलं आहे, त्यांनी कायदा आणि इतर गोष्टी समजून घ्यायला हव्यात’, असं मुख्यंमत्री यावेळी म्हणाले.

‘आजपर्यंत दिल्लीत आलो होतो. पण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा आलो. या भेटीत चांगल्या विषयांवर चर्चा झाली. महाराष्ट्राच्या ज्या काही आवश्यकता आहे त्यावर चर्चा झाली. राजकीय बाबी आपल्या ठिकाणी असल्या, तरी देशातलं महत्त्वाचं राज्य म्हणून केंद्राचं सहकार्य लाभायला हवं. राज्याच्या हिसासाठी केंद्राचं सहकार्य राहील असं आश्वासन दिलं’, असं देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.