शहीद जवानांच्या वीरपत्नी आणि माजी सैनिकांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

cm uddhav thackeray

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेशी संवाद साधला. यावेळी शहीद जवानांच्या वीरपत्नी आणि माजी सैनिकांना दिलासा देणारी माहिती दिली. राज्यातील कायम वास्तव्य करीत असलेल्या माजी सैनिक आणि शहीद जवानांच्या वीरपत्नींची घरपट्टी व मालमत्ता कर माफ करण्यात येणार आहे. बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजनेतंर्गत हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधताना शहीद जवानांच्या वीरपत्नी आणि माजी सैनिकांचा मालमत्ता कर माफ करणार असल्याची घोषणा केली. यावेळी ‘फोर्स वन’मधील जवानांसाठी महत्त्वाची घोषणा केली. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर फोर्स वनची उभारणी करण्यात आली. या फोर्स वनमधील शूर जवानांना, अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोग काळातील दरानेच प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

महाराष्ट्र द्वेष्ट्यांनी राज्याला बदनाम केले

महाराष्ट्र द्वेष्ट्यांनी राज्याला बदनाम केले. महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेली, असा गैरसमज त्यांच्याकडून पसरवण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्र द्वेष्टे हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरत आहे. या इतक्या बदनामीनंतरही आपल्या महाराष्ट्राने जून महिन्यात नव्या उदयोगधंद्यांशी १७ हजार कोटींचे करार केले. हे करार केवळ कागदावर राहणार नसून प्रत्यक्षात येतील, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले. त्यामुळे महाराष्ट्रात नवी गुंतवणूक आणि उद्योगधंदे येत आहेत. त्यामुळे रोजगार निर्माण होऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.