रोह्यातील बलात्कार पीडितेच्या कुटुंबाशी मुख्यंमत्र्यांची चर्चा, मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाला यश

Tambdi Budruk Maratha Morcha Protest 1
रायगडच्या रोह्यामध्ये झालेल्या अत्याचाराच्या अमानवी घटनेचा मराठा मोर्चातर्फे तांबडी बुद्रुक येथे निषेध करण्यात आला. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचं काटेकोर पालन करण्यात आलं.
Advertisement

रोह्याच्या तांबडी गावात घडलेल्या अल्पवयीन मुलीच्या हत्येच्या निषेधार्थ तांबडी पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी आंदोलन पुकारले होते. या प्रकरणात प्रशासन, पोलीस, स्थानिक राजकीय यंत्रणा, राजकीय दबावाखाली झुकल्याचं चित्र निर्माण झालं होतं. रोहा येथील स्वतःला मराठा समन्वयक म्हणवून घेणारे तथाकथित मराठा नेते या सर्वांच्या दबावापुढे न झुकता तांबडी ग्रामस्थ हजारोंच्या संख्येने पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी पीडित कुटुंबियांमागे ठामपणे उभा राहिला. त्यांना सकल मराठा समाज, महाराष्ट्र व मराठा क्रांती मोर्चा, महाराष्ट्र यांचे खंबीर सहकार्य मिळाले.

सदरचे निषेध आंदोलन व दुर्दैवी घटनेत बळी पडलेल्या अल्पवयीन भगिनीला श्रद्धांजली देण्यासाठी हे आंदोलन केले गेले. करोना प्रदुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी झालेला मोर्चा, निषेध आंदोलनात रूपांतर केला गेला. परिसरातील सर्व जातीचे ग्रामस्थ मराठा क्रांती मोर्चाच्या झेंड्याखाली आपल्या पीडित मुलीला न्याय मिळण्यासाठी एकत्र आले. संपूर्ण आंदोलन हे मराठा क्रांती मोर्चाच्या शिस्तीनुसार शांततेत, कुठल्याही घोषणा न देता, सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून केले गेले. मराठा क्रांती मोर्चा व तांबडी ग्रामस्थ यांच्या तडफदार व खंबीर भूमिकेमुळे सरकार, स्थानिक पोलीस प्रशासन व सर्व सरकारी यंत्रणा यांना अखेर झुकावे लागले. सरकार व पोलीस प्रशासन यांचे प्रतिनिधी म्हणून प्रांत अधिकारी, रोहा, व जिल्हा पोलिस उपअधीक्षक यांनी तांबडी गावात स्वतः उपस्थित राहून निवेदन स्वीकारले.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विडिओ कॉन्फरन्सींग द्वारे पीडितेच्या कुटुंबियांशी संवाद साधला. अशोक चव्हाण यांच्या सहकार्याने म्हांदळेकर कुटुंबीयांचा संवाद थेट विडिओ कॉन्फरन्सींग द्वारे मुख्यमंत्र्यांसोबत घडवून आणला गेला. यावेळी पीडितेच्या कुटुंबियांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांकडे मांडण्यात आल्या. त्यातील प्रमुख मागण्या त्वरित मान्य करण्यात आल्या व इतर मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा समन्वयक राजन घाग व त्यांचे सर्व सहकारी यांचे आणि मराठा क्रांती मोर्चाचे शांततेत, सोशल डिस्टन्सिंग पाळून केलेल्या आंदोलनाबद्दल विशेष आभार मानले.


Photo : रायगडमधील अत्याचाराच्या घटनेचा मराठा क्रांती मोर्चाकडून निषेध!