Mumbai Rain: मुख्यमंत्र्यांनी रात्री उशीरा घेतला पेडर रोड परिस्थितीचा आढावा, आदित्य ठाकरेही सोबत

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह इतर भागात वाऱ्यासह मुसळधार पाऊस होत आहे. मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पेडर रोडला भेट दिली. यावेळी त्यांच्यासह राज्यमंत्री आदित्य ठाकरे देखील उपस्थितीत होते.

दरम्यान, मुंबईला सतत दोन दिवस झोडपल्यानंतर काल देखील मुंबईत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु झाला होता. यामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने तळे तयार झाल्याचे दिसले. त्याचप्रमाणे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवरही याचा मोठा परिणाम झाला होता. तर बुधवारी मुंबईत अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना समोर आल्यात. दरम्यान, पेडर रोड येथे भूस्खलन झाल्याची घटना घडली. बुधवारी रात्री पेडर रोड येथे जमीन खचली असून परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरु होते. तसेच याठिकाणी एक दोन नाही तर ५० झाडे उन्मळून पडली होती.


रायगड जिल्ह्यालाही झोडपले

मुंबईसर रायगड जिल्ह्याला सलग दोन दिवस झोडपून काढल्यानंतर गुरुवारी पावसाचा जोर काहीसा कमी झाला, परंतु जोरदार वारे वाहत होते. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. घरांचेही नुकसान झाले. ३ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. २४ तासांत जिल्ह्यात सरासरी २०९.०५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. १ ऑगस्टपासून आजपर्यंत सरासरी २ हजार ०२२.९८ मिलिमीटर पाऊस पडला. आतापर्यंत वार्षिक पर्जन्यमानाच्या ६२.९० टक्के पाऊस पडला आहे. (सविस्तर वाचा)


मुंबईची झाली तुंबई

दक्षिण मुंबईत बुधवारी चार तासांत सरासरी ३०० मिमी पाऊस पडला. मुंबईत कितीही पाऊस पडला तरी मंत्रालय आणि ओव्हल मैदानाचा परिसर, नरीमन पॉईंट, मरीन ड्राईव्ह या परिसरात कधीही पाणी भरत नाही, अशी या भागांची ओळख आहे. मात्र, बुधवारच्या झालेल्या पावसात हे भागही पावसाच्या पाण्याने तुंबले होते. तर पावसाळ्यात मुंबईत तुंबणाऱ्या ठिकाणांव्यतिरिक्त नवे भाग बुधवारच्या पावसामुळे जलमय झाल्याचे बघायला मिळाले. मंत्रालय, मुंबई विद्यापीठ, उच्च न्यायालय, गिरगाव चौपाटी परिसर हे भाग पहिल्यांदाच पाण्याने भरून अनेक ठिकाणी तुंबल्याचे बघायला मिळाले