घरमहाराष्ट्रकुरबुरी थांबवा, नाहीतर उद्धव राजीनामा देतील

कुरबुरी थांबवा, नाहीतर उद्धव राजीनामा देतील

Subscribe

राज्यात शिवसेनेसोबत सत्तेत असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीची मंडळी नीट वागली नाहीत आणि त्यांच्या कुरबुरी सुरूच राहिल्यातर उद्धव ठाकरे कधीही राजीनामा देतील. कारण तो राजकारणी माणूस नाही. मी त्यांना जवळून पाहिले आहे. बाळासाहेब ठाकरे असल्यापासून मी त्यांना ओळखतो. तो कलावंत माणूस आहे. शब्द पाळणारा माणूस आहे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी म्हटले आहे.

यशवंतराव गडाख यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या वर्तणुकीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. काँग्रेस, राष्ट्रवादीचा एक मंत्री रोज रुसतो. कधी या पक्षात कुरबुरी सुरू असतात, तर कधी त्या पक्षात नाराजीनाट्य घडत असते. बंगला नीट मिळाला नाही, खातं नीट मिळालं नाही, यावरुन काँग्रेस, राष्ट्रवादीत सुंदोपसुंदी सुरू असते. हे कुठेतरी थांबायला हवे, असे गडाख म्हणाले.

- Advertisement -

उद्धव ठाकरेंचं कौतुक करणार्‍या गडाख यांनी काँग्रेसच्या नेत्यांना वर्तणूक सुधारण्याचा सल्ला दिला. उद्धव ठाकरेंनी निर्णय घेतला नसता, तर काँग्रेस पक्ष विरोधी बाकांवरच राहिला असता. त्यांना केवळ तोंडाची हवा सोडत राहावे लागले असते. पण उद्धव ठाकरेंनी निर्णय घेतल्याने तुम्ही मंत्री झालात. तरीही तुमचे हाच बंगला पाहिजे. तेच खाते पाहिजे, अशा कुरबुरी सुरू आहेत. आता तरी सुधारा, अशा शब्दांत गडाख यांनी काँग्रेसच्या मंत्र्यांची कानउघाडणी केली.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे आपण आपल्या भावना व्यक्त केल्याचंदेखील गडाख यांनी सांगितलं. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शहाणपणानं वागायला हवं, असं गडाख म्हणाले. उद्धव ठाकरे शब्द पाळणारा माणूस आहे. त्यांना मानसिक आणि शारीरिक स्वास्थ द्यायचे असेल, तर दोन्ही काँग्रेसने भांडणे कमी करायला हवीत. जरा शहाणपणाने वागायला हवे. म्हणजे हे सरकार चालेल,असे गडाख यांनी म्हटले आहे. राज्यात आता ग्रामीण भागातले सरकार आलेले आहे. ग्रामीण भागातले प्रश्न सोडवायला तुम्हाला कशाला बंगले पाहिजे? कशाला कार्यालये पाहिजेत? राहता कशाला मुंबईतल्या बंगल्यांमध्ये, असे प्रश्न गडाख यांनी उपस्थित केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -