घरमहाराष्ट्रकॉलेज निवडणुकांचे बिगूल वाजले

कॉलेज निवडणुकांचे बिगूल वाजले

Subscribe

विद्यार्थी परिषद निवडणूक कार्यक्रम जाहीर : 30 ऑगस्टला मतदान

राज्यातील कॉलेजांमध्ये तब्बल 25 वर्षाहून अधिक काळानंतर पुन्हा होणार्‍या विद्यार्थी परिषद निवडणुकीचे बिगुल अखेर वाजलं आहे. विद्यार्थी परिषद निवडणुकीचे वेळापत्रक बुधवारी मुंबई विद्यापीठाने जाहीर झाले. 19 ऑगस्टपासून निवडणूक प्रकिया सुरू होणार असून 20 ऑगस्टपासून आचारसंहिता लागू होणार आहे. विविध पदांसाठी 30 ऑगस्टला मतदान होणार आहे.

मुंबई विद्यापीठ विभाग विद्यार्थी परिषदेसाठी विभाग प्रतिनिधी, अध्यक्ष, सचिव, मागास प्रवर्ग प्रतिनिधी व महिला प्रतिनिधी या पदांकरिता निवडणुक घेण्यात येणार आहे. तसेच कॉलेज विद्यार्थी परिषदेसाठी वर्ग प्रतिनिधी, अध्यक्ष, सचिव, मागास प्रवर्ग प्रतिनिधी व महिला प्रतिनिधी या पदांकरिता निवडणूक होणार आहे. मुंबई विद्यापीठातील कॉलेजांमधील विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध संघटना आपल्या प्रतिनिधींना निवडणुकीच्या रणांगणात उतरविण्यासाठी उत्सुक होत्या, परंतु, कोणत्याही पक्ष अथवा संघटनांना या निवडणुकीत सहभागी होता येणार नाही, असे विद्यापीठाने नियमावलीत स्पष्ट करण्यात आल्याने इच्छुक उमेदवारांना कोणत्याही पक्ष अथवा संघटनेचा आधार न घेता वैयक्तिकरित्या निवडणुकांना सामोरे जावे लागणार आहे.

- Advertisement -

निवडणुकीचे वेळापत्रक बुधवारी जाहीर केले असले तरी यापूर्वीच निवडणुकीची कठोर आचारसंहिता जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार कोणत्याही उमेदवाराला कोणत्याही जात, धर्म, पंथ, संघटना अथवा पक्षाचे चिन्ह किंवा प्रतिमा वापरता येणार नाही. कॉलेज-विद्यापीठांमध्ये कुठलेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कठोर आचारसंहिता जाहीर झाल्याची चर्चा विद्यार्थ्यांमध्ये रंगली आहे.

निवडणुकीसाठी प्राचार्य किंवा संचालकांनी आपल्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार चार तासांची मतदानाची वेळ जाहीर करावी, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. निवडणुकीचा निकाल त्याच दिवशी जाहीर होणार आहे. निकाल घोषित झाल्यानंतर कॉलेजांना पदाधिकार्‍यांची माहिती विद्यापीठाकडे सादर करावी लागणार आहे.

- Advertisement -

*अशी असेल निवडणूक प्रक्रिया…

– मागास प्रवर्ग आरक्षणासाठी सोडत – 19 ऑगस्ट
– अंतिम मतदार यादी जाहीर – 22 ऑगस्ट
– अध्यक्ष, सचिव, मागास प्रवर्ग प्रतिनिधी व महिला प्रतिनिधी पदासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख – 23 ऑगस्ट
– अर्जाची छाननी व यादी प्रसिद्ध- 26 ऑगस्ट
– अर्जांवरील आक्षेपांची सुनावणी – 27 ऑगस्ट
– अर्ज मागे घेण्याची तारीख -28 ऑगस्ट
– मतदान – 30 ऑगस्ट (सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत)
– मतमोजणी व निकाल – 30 ऑगस्ट (दुपारी 4 नंतर)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -