नाशिकच्या राजकारणाला ‘अपूर्व’ रंग

हिरे यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादीचे भुजबळ वाढले

Mumbai
Apurv hire

राजकीय उपेक्षेतून निर्माण झालेली घुसमट दूर सारत सत्ताधारी पक्षातून बाहेर पडण्याचे धाडस दाखविणारे माजी शिक्षक आमदार डॉ.अपूर्व हिरे यांनी शुक्रवारी राजधानी मुंबईत पक्षश्रेष्ठी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.भारतीय जनता पक्षाकडून दोन वेळा विधानसभा तालिका सभापतीपदाची संधी मिळालेल्या डॉ. अपूर्व हिरे यांनी आगामी निवडणुकांसाठी खूप आधीपासूनच तयारी सुरू केली होती. प्रारंभी भाजपकडून नाशिक लोकसभा निवडणूक लढविण्याचा त्यांचा मनोदय होता. त्यादृष्टीने त्यांनी तयारीही सुरू केली होती.

मात्र भाजपच्या आरएसएस धार्जिण्या धोरणांमुळे लोकसभा उमेदवारीची त्यांची शक्यता मावळली, तर विधानसभेसाठीही नाशिक पश्चिममधून विद्यमान आमदार सीमा हिरे यांना डावलून तिकीट मिळण्याची शक्यता धूसर झाली. त्यातच स्थानिक पातळीवरील भाजप नेतृत्वाकडून सतत झालेली उपेक्षा त्यांच्या जिव्हारी लागलेली होती. या सगळ्या घडामोडींचा एकत्रित परिणाम भाजपच्या सोडचिठ्ठीमध्ये झाला.

भाजपमधून बाहेर पडल्यानंतर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हेच दोन प्रमुख पर्याय त्यांच्यासमोर होते. तेथेही शिवसेनेकडून त्यांना अपेक्षित असलेले राजकीय गणित जुळविणे अशक्य झाल्याने अपूर्व हिरे यांनी पुन्हा राष्ट्रवादीचे दरवाजे ठोठावले. मात्र नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात भुजबळांचे वाढलेले प्रस्थ व यापूर्वीच्या काळात भुजबळ-हिरे घराण्यातील राजकीय वैमनस्य हा त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशातील मोठा अडथळा होता. अखेर दोन पावले मागे सरकत हिरे यांनी भुजबळांशी येनकेन प्रकारे जुळवून घेत, भाजपच्या सोडचिठ्ठीनंतर निर्माण झालेला राजकीय वनवास संपुष्टात आणला आणि दस्तुरखुद्द भुजबळांच्या साक्षीने हिरे ‘त्रिमूर्ती’चा हजारभर कार्यकर्त्यांसमवेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला.

भाजपची राजकीय हानी
नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात आणि शिक्षण क्षेत्रात हिरे घराण्याचे योगदान व भूमिका नेहमीच महत्त्वपूर्ण राहिलेली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश जिल्ह्यातच नव्हे तर नाशिक व धुळे लोकसभा मतदारसंघासाठी प्रभावशाली ठरणार आहे. त्यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादीची ताकद या दोन्ही मतदारसंघात अनेक टक्क्यांनी वाढेल यात शंका नाही, तशीच भाजपची मोठी हानी होण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. कारण गेल्या काही काळात झालेल्या महापालिका, जि.प., ग्रामपंचायत, पंचायत समित्या निवडणुकांमध्ये भाजपेतर पक्षांचे दुसर्‍या-तिसर्‍या क्रमाकांचे बहुसंख्य उमेदवार, स्वपक्षावर नाराज असलेले अनेक भाजपेयी तसेच नाशिक सह जिल्ह्यातील अनेक असंतुष्ट नेते, पदाधिकारी अपूर्व हिरे यांच्या संपर्कात व सहवासात आहेत. त्यांची मोट बांधण्याचे कौशल्य हिरेंकडे पिढीजात आहे. त्याचा दृष्य परिणाम 2019 च्या लोकसभा-विधानसभा निवडणुकांमध्ये प्रत्यक्षपणे दिसेल हे दर्पणातील प्रतिबिंबा इतके स्पष्ट चित्र आहे. त्यामुळे हिरेंच्या भाजप त्यागाची किंमत भाजपला चुकवावी लागेल, हे निश्चित.

भुजबळ-हिरे समेट
साडेचार-पाच वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या भाजपच्या मोदी लाटेत काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षासह राष्ट्रवादी काँग्रेस व अन्य पक्षांची उडालेली धुळधाणीतून सद्यस्थितीत केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच उभी राहू पाहात आहे. भुजबळांवरील बालंट दूर झाले नसले तरी त्यांचे सक्रीय होणे व त्याला हिरे घराण्याची जोड मिळणे हा योगायोग राष्ट्रवादीसाठी नवसंजीवनी देणारा ठरेल. हिरे कुटुंबियांकडून भुजबळांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न यशस्वी झाल्याने खुद्द भुजबळांनीच शुक्रवारच्या प्रवेश सोहळ्यात आपापसातील मतभेद-मनभेद दूर झाल्याचे जाहीर वक्तव्य करतानाच आगामी काळात हिरे कुटुंबाला मानाचे स्थान देण्याची घोषणाही करून टाकली. त्यामुळे आगामी निवडणुकांत भाजपच्या लाटेशी टक्कर देण्याची क्षमता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दिसून आली तर त्यात आश्चर्य वाटणार नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here