घरCORONA UPDATEआयुक्त तुकाराम मुंढे झाले उद्विग्न; म्हणाले, 'काम करायचे नसेल तर घरी जा'!

आयुक्त तुकाराम मुंढे झाले उद्विग्न; म्हणाले, ‘काम करायचे नसेल तर घरी जा’!

Subscribe

कोरोना संसर्गाने सर्वत्र हाहा:कार माजवला असताना पालिकेच्या हॉस्पिटलला आलेली उकिरड्याची अवकळा पाहून महापालिका आयुक्त मुंढे चांगलेच संतापले.

नागपूर महापालिकेच्या हॉस्पिटलचा झालेला उकिरडा आता स्वत: पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनाच सतावू लागला आहे. कोरोना संसर्गाने सर्वत्र हाहा:कार माजवला असताना पालिकेच्या हॉस्पिटलला आलेली उकिरड्याची अवकळा पाहून महापालिका आयुक्त मुंढे चांगलेच संतापले. ‘काम करायचे नसेल तर घरी जा’, असा सक्त इशारा देत मुंढे यांनी पालिकेच्या डॉक्टरांना दिला.

हेही वाचा – Lockdown नंतर पंतप्रधान मोदी उद्या पुन्हा देशाला संबोधित करणार

- Advertisement -

आयुक्तांनी दिली पालिका हॉस्पिटलला भेट 

कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर आयुक्त मुंढे यांनी अधिकारी आणि कर्मचार्‍यांची शाळा घेतला. नागपूर महापालिकेचे सर्वात चांगले हॉस्पिटल उकिरड्याचे झाले असल्याचे खडेबोल आयुक्तांनी या डॉक्टरांना सुनावले. यापुढे हे खपवून घेणार नाही, असे बजावत त्यांनी यंत्रणेला कामाला लावत तात्काळ सुविधा सुरू करण्याची ताकीद दिली. पालिकेच्या सेवेत असूनही पालिकेचे डॉक्टर चांगली सेवा देत नसल्याची बाब आयुक्तांच्या नजरेत आली होती. विशेष म्हणजे देशभर महामारीचे संकट उभे राहिले असताना पालिकेचे डॉक्टर हातावरील घडी सोडायचे नाव घेत नव्हते. पालिकेच्या हॉस्पिटलला भेट दिली तेव्हा आयुक्तांना हॉस्पिटलला उकिरड्याचे रूप आल्याचे पाहायला मिळाले. पालिकेच्या सेवेतील डॉक्टर खासगी प्रॅक्टिसला अधिक महत्व देत असल्याच्या वाढत्या तक्रारी आयुक्त मुंढे यांच्या कानी आल्या होत्या. डॉक्टरांना झापताना त्यांनी ज्यांना जमत नाही त्यांनी घरी जावे, असा दमच कामचोर डॉक्टरांना दिला.

हेही वाचा – Coronavirus : खासगी दवाखाने व रुग्णालये ताप, खोकला अशा रुग्णांवर उपचार करत नाही!

- Advertisement -

पालिका हॉस्पिटल पूर्ण सुविधेनिशी सज्ज करा

काम न करणारे कर्मचारी केवळ नकारात्मक बाबी घेऊन बसतात. एखादी कमतरता हे कर्मचारी मोठी म्हणून दाखवत पालिकेचे धिंडवडे काढतात, अशा बाबीही आयुक्तांच्या नजरेत आणून देण्यात आल्या होत्या. हेच कर्मचारी पालिकेची गोपनीय माहिती बाहेर फोडतात, असे सांगत आयुक्तांनी यापुढे हे लाड खपवून घेणार नाही, अशी समज वॉर रुमच्या भेटीवेळी दिली. कोरोनाशी दोन हात करण्यासाठी पालिकेचे हॉस्पिटल पूर्ण सुविधेनिशी सज्ज झाले पाहिजे, असे आदेशच त्यांनी संबंधितांना काढले.

खासगी डॉक्टरांना इशारा

संकटात सरकारी डॉक्टर आपल्या जीवाचे रान करत असताना कोरोनाच्या संसर्गाचा धसका घेऊन व्यवसाय बंद ठेवलेल्या नागपूरमधील खासगी डॉक्टरांनी आपल्या सेवेचा फायदा रुग्णांना द्यावा, अन्यथा त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करावी लागेल, असा सज्जड इशारा पालिका आयुक्तांनी दिला आहे. राज्यात कोरोना संसर्गाचा उच्छाद निर्माण झाला असताना खाजगी डॉक्टांनी अशा संकटात आपले दवाखाने बंद ठेवून कृतघ्नता दर्शवली आहे. खासगी डॉक्टरांच्या या कृतीमुळे सर्वसाधारण रुग्णांवरील उपचार जवळपास थांबले आहेत. याची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या डॉक्टरांना आवाहन केले होते. नागपूरमध्येही खासगी डॉक्टरांनी बंद ठेवलेल्या दवाखान्यांची दखल घेत पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या डॉक्टरांना तात्काळ सेवा देण्याच्या सूचना दिल्या. डॉक्टर याकडे दुर्लक्ष करणार असल्यास त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करावी लागेल, असा इशारा मुंढे यांनी दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -