घरलोकसभा २०१९ग्राउंड रिपोर्टकर्नाटकात काँग्रेस, जदला भाजपचे कडवे आव्हान

कर्नाटकात काँग्रेस, जदला भाजपचे कडवे आव्हान

Subscribe

महाराष्ट्राचे शेजारील राज्य कर्नाटकमध्ये दोन टप्प्यांत लोकसभा निवडणुक होत आहे. कर्नाटकातील एकूण २८ लोकसभा मतदार संघांपैकी पहिल्या टप्प्यात १४ मतदार संघात पहिल्या टप्प्यात १८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर दुसर्‍या टप्प्यात २३ एप्रिल रोजी १४ मतदार संघात मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने २८ पैकी २६ जागांचे लक्ष्य ठेवले आहे. मागील विधान सभा निवडणुकीत भाजप कर्नाटकात सत्तेपर्यंत पोहचली होती. मात्र ऐनवेळी काँग्रेसने जनता दल सेक्युलरला सत्तास्थापनेसाठी पाठिंबा दिल्यामुळे भाजप सत्तेपासून बाहेर राहिली. तरीही सध्या कर्नाटकात भाजपची हवा असल्याचे मानले जाते. भाजप येडीयुरप्पा यांच्या नेतृत्त्वाखाली कर्नाटकात चांगली कामगिरी करील असे मानले जात आहे.

मागील लोकसभा निवडणुकीत कर्नाटकात भाजपला १७ जागा मिळाल्या होत्या. मात्र या निवडणुकीत हा आकडा पुढे जाईल इतके नक्की. दुसर्‍या बाजूला कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस ही निवडणूक लढणार आहे. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत कर्नाटकात काँग्रेस मजबूत आहे. मात्र केवळ भाजपला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी त्यांनी विधान सभेला फक्त ३७ जागा मिळालेल्या जनता दल सेक्युलर पक्षाला पुढे केल्यामुळे कर्नाटकातील काँग्रेसचे नेते आणि पदाधिकारी नाराज आहेत.

- Advertisement -

त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला बसणार हे निश्चित आहे. दुसर्‍या बाजूला भाजपला राज्यात सर्वाधिक जागा मिळाल्यानंतरही त्यांना सत्ता मिळू शकलेली नाही. त्याचा बदला लोकसभा निवडणुकीत घ्यायचा, अशा विचाराने भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी प्रेरित होऊन कामाला लागले आहेत. त्याचा परिणाम येत्या लोकसभा निवडणुकीत दिसून येणार आहे.

कर्नाटकातील मतदार
मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी कर्नाटकातील मतदारांमध्ये तब्बल १२ टक्क्यांची वाढ झाली आहे. या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातून ४९ कोटी ६८ लाख २३५१ मतदार, मतदान करणार आहेत. मतदारांमध्ये सुमारे तब्बल ७० लाखांची वाढ झाली असून त्यात १८ ते १९ वर्षीय मतदारांची संख्या जास्त आहे. या मतदारांमध्ये २४ कोटी ४७ लाख १९७९ मतदार महिला आहेत. तर २५ कोटी २० लाख ५८२० मतदार पुरुष आहेत. ४,५५२ मतदार हे किन्नर आहेत.

- Advertisement -

कर्नाटकातील मतदार संघ
१- उडपी, २- हसन, ३- दक्षिण कन्नडा, ४- चित्रदुर्ग, ५- टुमकूर, ६ – मंड्या, ७ – कामराजनगर, ८- बंगळुरू ग्रामीण, ९- बंगळुरू उत्तर, १० – बंगळुरू मध्य, ११ – बंगळुरू दक्षिण, १२ -चिकबलापुरम्, १३- म्हैसूर, १४- चिकमंगलूर, १५ – चिक्कोडी, १६ – बेळगाव, १७ -बागलकोट, १८ – बिजापूर, १९ -गुलबर्गा, २० – रायचूर, २१ -बिदर, २२ – कोप्पल, २३ – बेल्लारी, २४ – हवेरी, २५ – उत्तर कन्नडा, २६ – दवंगेरी, २७ – शिमोगा, २८ -धारवाड

२०१४ सालचे पक्षीय बलाबल
भारतीय जनता पक्ष -१७, काँग्रेस – ९, जनता दल (सेक्युलर) -२, एकूण -२८. २०१४ सालच्या निवडणुकीत भाजपला कर्नाटकात ४३ टक्के मते मिळाली होती. काँग्रेसला ४०.८ टक्के मते मिळाली. तर कुमारस्वामी यांच्या नेतृत्त्वाखालील जनता दल सेक्युलरला ११ टक्के मते मिळाली होती.

Santosh Malkarhttps://www.mymahanagar.com/author/msantosh/
आपलं महानगर मुंबई आवृत्ती निवासी संपादक. गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -