रामटेकमधील गटबाजीचा काँग्रेसला फटका

Mumbai
रामटेक

रामटेक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेमध्ये कृपाल तुमाने यांना दुसरा स्पर्धक नव्हता, ही शिवसेना-भाजपसाठी जमेची बाजू ठरली. कारण काँग्रेसमध्ये मुकुल वासनिक आणि नितीन राऊत हे दोन तुल्यबळ नेते य ठिकाणाहून लोकसभेसाठी इच्छूक होते, मात्र काँग्रेसने २०१८मध्ये बसपमधून काँग्रेसमध्ये आलेले किशोर गजभिये यांना उमेेदवारी दिल्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर रामटेक काँग्रेसमध्ये गटबाजीने जोर धरला आहे. त्यामुळे या ठिकाणी युतीचे पारडे जड झाले असले, तरी मागासवर्गीय आणि बहुजन मतदारांची मते या ठिकाणी निर्णायक आहेत. म्हणून इथे बसप आणि वंचित बहुजन आघाडी या दोन्ही पक्षांनी उमेदवार उभे केले आहेत. परिणामी या निवडणुकीत मत विभागणी होणार असल्यामुळे शिवसेना आणि काँग्रेसमधील लढत चुरशीची बनण्याची शक्यता आहे.

रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत काटोल, सावनेर, हिंगना, उमरेड, कामटी आणि रामटेक असे सहा विधानसभा क्षेत्रे येतात. विदर्भातील रामटेक हा लोकसभा मतदारसंघ आता शिवसेनेचा बालेकिल्ला बनला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे या मतदारसंघाकडे विशेष लक्ष होते. युतीच्या स्थापनेनंतर त्यांची पहिली विदर्भातील सभा रामटेक येथे झाली होती आणि त्या सभेनंतर शिवसेनेच्या या लोकसभा मतदारसंघाविषयी आस्था वाढल्या. विशेष म्हणजे तेव्हापासून या लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचा खासदार सलग तीन निवडणुकांमध्ये जिंकून आला.

स्वातंत्र्यापासून साडेचार दशकांपर्यंतची येथील काँग्रेसची सत्ता शिवसेनेने हिसकावून घेतली आणि आता रामटेक शिवसेनेचा बालेकिल्ला बनला आहे. २०१४ साली शिवसेनेचे कृपाल तुमाने या लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. शिवसेनेत या ठिकाणी कुणी इच्छूक नव्हते, त्यामुळे शिवसेनेला कृपाल तुमाने यांना पुन्हा उमेदवारी देऊन सर्व ताकदीनीशी प्रचार सुरू केला आहे. भाजपचीही तुमाने यांना संपूर्ण साथ असून यंदाच्या निवडणुकीत या मतदारसंघात शिवसेनेसाठी ही जमेची बाजू आहे. त्यामुळे या ठिकाणी सध्या तरी युतीचे पारडे जड दिसत आहे.

इथे युतीचे वजन जास्त असण्यामागे काँग्रेसमधील गटबाजी हे प्रमुख कारण आहे. रामटेकमध्ये काँग्रेसचे दोन चेहरे आहेत. मुकुल वासनीक आणि नितीन राऊत. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत हे दोघेही इच्छूक होते. त्यातल्या त्यात नितीन राऊत जास्त आग्रही होते. भाजप-सेनेच्या ५ वर्षांच्या सत्ताकाळात सरकारबद्दल काहीप्रमाणात नाराजी आहे. २०१४ प्रमाणे मोदी लाटही नाही. म्हणून या ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह नेत्यांच्याही आशा पल्लवित झाल्या होत्या. नितीन राऊत तर लोकसभेच्या तयारीलाही लागले होते. मात्र २०१८ मध्ये किशोर गजभिये हे बहुजन समाज पक्षातून बाहेर पडून काँग्रेसमध्ये आले आणि २०१९मध्ये काँग्रेस हायकमांडने गजभिये यांना उमेदवारीही दिली. जुन्या, निष्ठावान नेत्यांना डावलून बाहेरून आलेल्यांना उमेदवारी दिल्याने आता कार्यकर्त्यांसह नेत्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. १९८७च्या बॅचमधील प्रशासकीय अधिकारी किशोर गजभिये हे समाज कल्याण विभागात सचिव म्हणून काम करत होते.

२०१०मध्ये सेवानिवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी खासगी क्षेत्रात काम सुरू केले आणि त्यानंतर ते राजकारणात सक्रिय झाले. २०१८ मध्ये ते काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसवासी झाले. ज्या वेळी किशोर गजभिये यांची उमेदवारी जाहीर झाली, तेव्हा नितीन राऊत हे दिल्ली दरबारीही जावून आले होते. 11 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची नागपुरात सभा होणार आहे, त्या सभेकडून काँग्रेसच्या उमेदवारांना खूप आशा आहेत, पण दिल्लीतून स्टार प्रचारक आले तरी स्थानिक नेतृत्वातील गुंता सुटणार का, हा प्रश्न आहे.

हा लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. यामध्ये मागासवर्गीय जातीचे तसेच बहुजन मतदारांची मते निर्णायक आहेत. म्हणूनच अनुसूचित जातीचे प्रतिनिधीत्व करणारे नितीन राऊत याठिकाणी जबरदस्त आशावादी होते. आता या निवडणुकीत बहुजन समाज पक्षाने सुभाष गजभिये यांना उमेदवारी दिली असून वंचित बहुजन आघाडीने किरण रोडगे यांना उमेदवारी दिली आहे. जातीचे समीकरण करताना बसप आणि वंचित बहुजन आघाडीचे उमदेवारही मतांचा वाटा उचलतील, तेव्हा मात्र शिवसेना आणि काँग्रेस या दोघांसाठी ही निवडणूक चुरशीची बनेल.

१९५७ पासून ते १९९८ पर्यंत रामटेक लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेस पक्षाचा खासदार सलग निवडून आला होता. त्यानंतर मात्र १९९९ पासून २००७ या कालावधीत तीन निवडणुकांमध्ये शिवसेनेचा खासदार जिंकून आला होता. २००९ मध्ये मात्र पुन्हा काँग्रेसचा खासदार निवडून आला. २०१४ मध्ये पुन्हा शिवसेनेने या जागेवर शिक्कामोर्तब केला. आता २०१९ मध्ये शिवसेना-भाजप महायुतीच्या वतीने शिवसेनेचे कृपाल तुमाने यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसच्या वतीने किशोर गजभिये यांना उमेदवारी देण्यात आली असून वंचित बहुजन आघाडीने किरण रोडगे यांना उमेदवारी दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here