घरमहाराष्ट्र'काँग्रेस आता फडणवीस सरकारच्या बनवाबनवीचा पर्दाफाश करणार'

‘काँग्रेस आता फडणवीस सरकारच्या बनवाबनवीचा पर्दाफाश करणार’

Subscribe

पर्दाफाश सभेमार्फत काँग्रेस सरकारच्या बनवाबनवीचा पर्दाफाश करणार असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत. अमरावती येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

‘काँग्रेसचे सर्व नेते राज्यभर फिरून सरकारच्या कामांचा समाचार घेणार. गावोगावी सभा घेऊन ते सरकारच्या बनवाबनवीचा पर्दाफाश करणार आहेत’, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या महा पर्दापाश सभेला आजपासून सुरुवात झाली आहे. ‘घालवूया लबाडांचे सरकार’ या टॅगलाइनखाली आता काँग्रेस राज्यभरात भाजप सरकारच्या विरोधात सभा घेणार आहे. या सभेसंदर्भात अमरावतीमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. या पत्रकार परिषदेत बाळासाहेब थोरात यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली.

‘शौचालय, घरकूल प्रमाणे बेरोजगारीचीही जबाबदारी घ्या’

‘शौचालय आणि घरकूल या योजना पूर्वीपासून सुरु आहेत. यात नवीन असे काहीच नाही. सरकारने या योजनांचे भांडवल करुन मतांचे राजकारण केले. खरंतर आज रोजगाराची मोठी समस्या निर्माण झाली आहे. देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे ढबघाईला गेलेली दिसत आहे. याची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे. एक शौचालय बांधून दिले, त्याचा जसा आनंद व्यक्त करत आहात, तसे मुले बेरोजगार आहेत, त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत. तर मग याचीही जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे ना!’, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

- Advertisement -

विदर्भातील लोकांनी काँग्रेसला का निवडून द्यावे?

विदर्भातील लोकांनी काँग्रेसला का निवडून द्यावे? असा प्रश्न जेव्हा विचारण्यात आला तेव्हा थोरात म्हणाले की, ‘भाजपने विदर्भात फक्त भाषणे चांगली केली. बाकी काहीच भाजप विदर्भाला देऊ शकला नाही. काँग्रेसने वेळोवेळी विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा दिला. कापूस शेतकऱ्यांना मदत केली. त्याचबरोबर सोयाबिन शेतकऱ्यांना देखील काँग्रेसने दिलासा दिला. मात्र, भाजपने काय दिले? साधे पिकविम्याचे पैसे देखील भाजप शेतकऱ्यांना देऊ शकला नाही.’ ‘जर तुम्ही म्हणत असाल की पीकविम्याचे पैसे दिले, तर शिवसेनेचा पीकविम्या संदर्भात निघालेला मोर्चा चुकीचा आहे का?’, असा प्रश्न थोरात यांनी उपस्थित केला.

‘बॅलेट पेपरच्या मागणीवर ठाम’

पत्रकार परिषदेत नेहमीप्रमाणे थोरात यांना ईव्हीएम संदर्भात प्रश्न विचारला गेला. त्यावेळी त्यांनी मतदान बॅलेट पेपरवरच व्हावे, याच विनंतीवर आपण ठाम असल्याचे म्हटले. ‘काँग्रेसने कायम चढउतार पाहिलेले आहेत. अडचणींच्या काळही काँग्रेसने पाहिला आहे. प्रतिकूल परिस्थितही काँग्रेस पक्ष दमदारपणे उभा राहिलेलाही आपण पाहिला आहे. १९८०, १९९९ ही त्याचीच उदाहरणे आहेत. काही माणसं पक्ष सोडून जातात. खरंतर काँग्रेसचे अनेक फायदे घेऊन लोक पक्ष सोडून जातात. परंतु, ते गेल्यामुळे नवोदित तरुणांना काम करण्याची संधी मिळते. म्हणून मी कायम म्हणत असतो की जागा खाली झाली की जागा भरा आणि नवनेतृत्वाने काम करुन दाखवा’, असेही बाळासाहेब थोरात म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -