घरमहाराष्ट्र'हा दांभिकपणा भाजपच करु शकते'; सचिन सावंत यांची टीका

‘हा दांभिकपणा भाजपच करु शकते’; सचिन सावंत यांची टीका

Subscribe

एका पोलिसाला मारहाण करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना सोडा सांगणारे भाजपचे आमदार राम कदम आणि भाजपवर सचिन सावंत यांची टीका

पोलीस कॉन्स्टेबलला मारहाण करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना सोडा म्हणून सांगणाऱ्या भाजपचे आमदार राम कदम यांच्यावर काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी टीका केली आहे. माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्याला अटक केल्यानंतरही आंदोलन करणारा भाजप पक्ष आता पोलिसाला मारहाण करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना सोडायला सांगत आहे. हा दांभिकपणा भाजपच करु शकते अशी टीका सचिन सावंत यांनी केली आहे. पवई पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबलला भाजपच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली होती. या घटनेनंतर भाजप आमदार राम कदम यांनी या आरोपींना सोडा, अशी विनंती करणारा फोन मारहाण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याला केला. दरम्यान, राम कदम आणि पोलीस कर्मचारी यांच्यातील संवादाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने राम कदम आणि भाजपवर जोरदार टीका केली जात आहे.

काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी भाजपचे आमदार राम कदम, अतुल भातखळकर आणि भाजपवर निशाणा साधला आहे. “माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्यांना अटक झाली होती तरी त्याविरोधात आंदोलनाचा तमाशा अतुल भातखळकर यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी केला. राज्यपालांना भेटले. आता एका पोलीसाला मारहाण करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना राम कदम सोडा म्हणतात. हा दांभिकपणा, दुतोंडीपणा भाजपाच करु शकते,” अशी टीका सचिन सावंत यांनी केली आहे.

- Advertisement -

भाजपचे कार्यकर्ते ट्रिपल सीट प्रवास करताना पोलिसांनी आरोपी सचिन तिवारी, दिपू तिवारी आणि आयुष राजभर यांना ताब्यात घेतलं होतं. यावेळी या आरोपींनी गाडीतच नितीन खैरमाडे यांना मारहाण केली. या प्रकारानंतर या तिघांवरही गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर राम कदम यांनी पोलीस कॉन्स्टेबल नितीन खैरमोडे यांना फोन करुन त्यांना सोडण्याची विनंती केली. “तुम्हाला झालेल्या मारहाणीचे मी समर्थन करत नाही. पण माणूसकीच्या दृष्टीकोनातून आणि त्या तिघांच्या भविष्याचा विचार करा. त्या तिघांच्या करिअरचा प्रश्न आहे. त्यांचं लग्नही झालेलं नाही,” असं म्हणत राम कदमांनी तक्रार मागे घेण्याची मागणी केली. या संवादाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -