भिवंडीत अतिआत्मविश्वास नडला; पोषक वातावरण असूनही काँग्रेसचा पराभव

bhiwandi lok sabha constituency result 2019
काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे (डावीकडे) आणि भाजपचे विजयी खासदार कपिल पाटील (उजवीकडे)

भिवंडी लोकसभा क्षेत्रात काँग्रेस उमेदवारांसह पदाधिकाऱ्यांमध्ये असलेला अतिआत्मविश्वाससह कासव गतीने सुरु असलेला प्रचार हीच पराभवाची मुख्य कारण असल्याचे प्रकर्षाने जाणवते. या मतदारसंघात काँग्रेससाठी पोषक वातावरण असताना प्रदेश काँग्रेस कडून निवडणुकी दरम्यान एकही जाहीर सभा भिवंडीकरांच्या वाट्याला न देणे हे सुध्दा न उलगडणारे कोडेच आहे. तसेच अतिआत्मविश्वास हे नेहमीच पराभवास कारणीभूत ठरत आले आहे, हे भूतकाळातील असंख्य उदाहरणातून प्रतीत होत असताना काँग्रेसला चांगलाच फटका बसला आहे.

भिवंडी लोकसभेसाठी सुरवातीपासून उमेदवारीच्या शर्यतीत अग्रस्थानी असलेले माजी खासदार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीची घोषणा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सतरा दिवस आधी जाहीर करून सुद्धा एबी फॉर्म देण्यासाठी सुरेश टावरे यांना करावा लागलेला संघर्ष मतदारांच्या पचनी पडत नसल्याने मतदारांनी कपिल पाटील या सक्षम नेत्याच्या पाठीशी भक्कम साथ देत उभे राहणे पसंत केले.

भिवंडी शहरातील भिवंडी पूर्व आणि पश्चिम या दोन विधानसभा क्षेत्रातील अल्पसंख्याक मतांचे ५४ टक्के प्रमाण आणि त्यासोबतच संपूर्ण लोकसभा मतदारसंघात मुस्लिमांची असलेली निर्णायक मते ही काँग्रेस शिवाय कोठे जाणार नाहीत, या आत्मविश्वासाने काँग्रेसचा प्रचार सुरु झाला. परंतु दुर्दैव हे की आपणास मत देणाऱ्या मतदारांपर्यंत कार्यकर्ता पोहचणे गरजेचे होते. परंतु काँग्रेसकडे कार्यकर्त्यांची वानवा असल्याने हक्काच्या मतदारांपर्यंत पोहचणार कोण? हा खरा प्रश्न आहे.

नियोजनाचा अभावही नडला

काँग्रेस उमेदवार सुरेश टावरे यांच्या प्रचाराची रणनीती सुरवातीपासून काँग्रेस नगरसेवकांकडून झालेल्या विरोधामुळे कोलमडली ती कधी सावरू शकलीच नाही. सुरेश टावरे यांनी प्रचारासाठी वेळ देण्याऐवजी या नाराज नगरसेवकांच्या नाकदुऱ्या काढण्यातच वेळ खर्ची पडला. त्यातच काँग्रेस पक्षाचा एकही वरिष्ठ नेता भिवंडी लोकसभा मतदारसंघाकडे फिरकलेच नाही. भाजपा पक्षाकडून उत्तर भारतीय तीन-तीन नेत्यांच्या सभा झाल्यावर मुख्यमंत्री यांनी स्वतः या मतदारसंघात दोन जाहीरसभा घेऊन वातावरण निर्मिती करीत असताना काँग्रेस कुठे प्रचार करीत होती, हे समजूच शकले नाही. त्यातच ज्या अल्पसंख्याक समाजाला गृहीत धरून त्यांच्याबद्दल आत्मविश्वास बाळगून होते, त्या समाजालासुध्दा अधिक मतदानासाठी घराबाहेर काढण्यात काँग्रेसजन अपयशी ठरले. फक्त नाना पटोले आणि माणिकराव ठाकरे यांची नावापुरती एक सभा भिवंडी ग्रामीण भागात घेऊन वेळ मारून नेली.

त्यातच काँग्रेस म्हणतील की कार्यकर्ते कमी नेते जास्त या उक्ती प्रमाणे प्रत्येक जण स्वतःचा मानसन्मान जपत प्रचारात उतरले त्यामुळे त्यांचा काडीचाही उपयोग मतदारांना प्रभावित करण्यासाठी झाला नाही. कपिल पाटील यांच्यावर सुरवाती पासून नाराज असलेल्यांकडून काँग्रेसला मोठं पाठबळ मिळेल, या भ्रमात राहिले परंतु नाराज असलेल्यापर्यंत पोहचणे गरजेचे असते. हेच विसरलेले काँग्रेसी नेते आपल्या अति फाजील आत्मविश्वासामुळे या पराभवाने तोंडघशी पडले आहेत, एवढे मात्र नक्की आहे.