घरताज्या घडामोडीयशोमती ठाकूर यांचे मंत्रीपद अडचणीत; पोलीस मारहाणप्रकरणी ३ महिन्यांची शिक्षा!

यशोमती ठाकूर यांचे मंत्रीपद अडचणीत; पोलीस मारहाणप्रकरणी ३ महिन्यांची शिक्षा!

Subscribe

अमरावतीतील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांचे मंत्रीपद अडचणीत आले आहे. उल्हास रौराळे या पोलीस हवालदाराला मारहाण केल्याप्रकरणी अमरावती जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना तीन महिन्यांची साधी कैद आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. ठाकूर यांना दखलपात्र गुन्ह्यात शिक्षा झाल्याने त्यांचे मंत्रीपद दावणीला लागण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

अमरावतीत अंबादेवी मंदिराजवळ उल्हास रौराळे या पोलीस कर्मचाऱ्याला यशोमती ठाकूर यांनी मारहाण केली होती. २०१२ मध्ये ही घटना घडली होती. आठ वर्षांनंतर या खटल्याचा निकाल लागला. रौराळे यांना यशोमती ठाकूर यांच्यासह वाहनचालक आणि दोन कार्यकर्त्यांनीही मारहाण केली होती. याप्रकरणी अमरावती सत्र न्यायालयात खटला दाखल होता. न्यायालयाने ठाकूर यांना तीन महिने शिक्षा आणि १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी अमरावती जिल्हा न्यायालयात आरोप सिद्ध झाले आहेत. त्यांच्या कार चालक आणि सोबतचे दोन कार्यकर्त्यांनाही न्यायालयाने दोषी ठरवले आहे. तर फितुर होऊन साक्ष देणारा एक पोलीस कर्मचारी देखील शिक्षेस पात्र झाला आहे. या शिक्षेनंतर यशोमती ठाकूर यांना बडतर्फ करण्याची मागणी आता भाजपने सुरू केली आहे. पक्षाचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी माध्यमांशी बोलताना ही मागणी केली.

- Advertisement -

यावर्षी जानेवारी महिन्यामध्ये यशोमती ठाकूर त्यांच्या एका वक्तव्यामुळे चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. ‘आपलं सरकार नव्हतं. आत्ताशी मी फक्त शपथ घेतलीये. खिसे गरम व्हायचे आहेत अजून. मला जिल्हाध्यक्षांनी सांगितलं की काही जमलं नाही अजून मॅडम. जे आपल्या विरोधात आहेत, त्यांचे खिसे बंबाटच भरले आहेत. ते खिसे रिकामे करायला आपल्या घरी आले, तर त्यांना नकार देऊ नका. घरी आलेल्या लक्ष्मीला कोण नाही म्हणतं?’ असं वक्तव्य यशोमती ठाकूर यांनी केलं होतं. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीदरम्यान जाहीर सभेमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं होतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -