टांगा पलटी घोडे फरार

सत्तास्थापनेतील अपयशामुळे काँग्रेस- राष्ट्रवादीचा एकमेकांवर पलटवार

Mumbai
Ajit Pawar
अजित पवार

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेवरून सुरू असलेला गदारोळ थांबता थांबयाचे नाव घेत नाही. सोमवारी शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसला एकत्र येऊन सत्तास्थापनेची संधी असताना शिवसेनेला काँग्रेस- राष्ट्रवादीकडून योग्य तो पाठिंबा न मिळाल्याने शिवसेनेचे मनसुबे उधळले गेले. त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप केला आहे. एकट्या राष्ट्रवादीने पाठींबा देऊन काही फायदा होणार नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी आहे.

विधानसभा निवडणूक आम्ही दोघांनी एकत्र लढली त्यामुळे आताही दोघांनी एकत्र निर्णय घेणे गरजेचे आहे. त्यामुळे थोडे सबुरीने घ्यावे लागेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि नेते अजित पवार यांनी सांगितले आहे.तर राज्यपालांनी तिसरा मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेच्या दाव्यासाठी बोलावले आहे. पण, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला ही सत्ता स्थापनेला शिवसेनेची गरज असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

तर काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यामुळे उशीर होत असल्याचे म्हटले. तर अजित पवार यांनी काँग्रेसमुळे समर्थन देता आले नसल्याचे म्हटले. त्यामुळे आता शिवसेनेच्या पाठींब्यावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्येही जुंपली असल्याचे सध्या चित्र पाहायला मिळत आहे.

काँग्रेस आमदार जयपूरला असल्याने अडचण

एकट्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पत्राने काहीही झाले नसते. आम्ही देखील काँग्रेसच्या पत्राची वाट पाहत होतो. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढल्याने दोघांनीही एकत्र हा निर्णय घेणे अपेक्षित होते. काँग्रेसचे आमदार सध्या जयपूरला असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधण्यात अडचण येत आहे. काँग्रेस सोबत आली तरच यातून काही मार्ग निघू शकतो, असे पवार यावेळी म्हणाले.