‘त्या’ ८० हजार Fake Twitter Account चा निर्माता भाजपचा आयटी सेल?

The municipal commissioner does not have a Twitter account
‘ट्विटर’

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात (Sushant Singh Rajput Death Case) मुंबई पोलिसांसह महाराष्ट्र सरकारची बदनामी करण्याच्या कटाचे हाती लागलेले धागेदोरे थेट भाजपच्या आयटी सेलपर्यंत पोहोचले असून, यातील पुरावे काँग्रेस पक्षाने मुंबई पोलीस आयुक्तांच्या स्वाधीन केले. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने हे पुरावे पोलीस आयुक्तांच्या स्वाधीन करताना या पुराव्यांच्या आधारे संबंधितांविरोधी कडक कारवाई करण्याची मागणी या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांकडे केली आहे. सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूच्या घटनेचा गैरफायदा घेत मुंबई पोलीस आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात सोशल मिडियाच्या माध्यमातून बदनामीची मोहीम राबवली जात होती, अशी माहिती पुढे आली आहे. ही मोहीम चालवण्यासाठी ८० हजार खोटे ट्विटर आकाऊंट उघडण्यात आल्याची बाब पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्रकार परिषदेत उघड केली होती. याच दरम्यान अमेरिकेच्या मिशिगन विद्यापीठानेही विशेष अहवाल तयार करून खोट्या ट्विटर आकाऊंटची माहिती पुढे आणली होती. पोलीस आयुक्तांकडील माहितीत खोटे आकाऊंट उघडलेल्यांनी मुंबई पोलिसांची यथेच्छ बदनामी केलीच. पण पोलीस दलात उत्तम काम करणार्‍या अधिकार्‍यांचीही अवहेलना करताना त्यांना शिव्यांची लाखोली वाहिल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

बदनामी हा कट भाजपच्या आयटी सेलने सुरू केल्याची पुराव्यासह माहिती काँग्रेस पक्षाच्या आयटी सेलने शोधून काढली असून, खोटे आकाऊंट वापरणाऱ्यांचा थेट संबंध भाजपच्या आयटी सेलशी असल्याची बाब काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पोलीस आयुक्तांच्या निदर्शनात आणून दिली. देशात लोकशाही संपवण्याचा कट एका गटाकडून सुरू आहे, सुशांतसिंह प्रकरणात फेसबुक, ट्विटरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात होता. काही निवडक चॅनेलसुद्धा या अपप्रचारात पुढे होते, असे सावंत यांनी स्पष्ट केले.

सुशांतच्या मृत्यू प्रकरणात मुंबई पोलीस आणि सरकारविरोधी जनमत तयार करून त्यावर भाजप नेत्यांनी जाहीर वक्तव्ये दिली. हा सारा प्रकार बिहारची निवडणूक डोळ्यांपुढे ठेऊन केला जात असल्याचा आरोप करताना सचिन सावंत यांनी या दहशतीमागे भाजप असल्याचा पुनरुच्चार केला. पालघरमध्ये साधूंच्या हत्या प्रकरणातही भाजपची चाल याच पद्धतीची होती, असा आरोप सावंत यांनी केला.

जुलै महिन्यात तयार करण्यात आलेल्या या बनावट ट्विटर आकाऊंटच्या माध्यमातून ४८ हजार संदेश पाठवण्यात आल्याची माहितीही सावंत यांनी आयुक्तांना दिली. महाराष्ट्र सरकार आणि पोलिसांच्या विरोधात एका मिनिटात २५ हजार ट्विट्स पडत होते. यात काही एजन्सींचाही हात होता. त्यांना फॉलो करणारी फेक अकाऊंट आहेत. याद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सरकारला पद्धतशीरपणे बदनाम केले जात होते, याचे पुरावेही सावंत यांनी पोलीस आयुक्तांच्या हाती दिले आहेत.