जे भाजपच्या पोटात तेच कंगनाच्या मुखात! काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची टीका

“जे भाजपच्या पोटात आहे तेच गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री कंगनाच्या मुखातून आणि ट्वीटमधून बाहेर येत आहे”, अशी टीका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी केली. कंगनाला पुढे करून मुंबई पोलीस, मराठी माणूस आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्र द्रोह्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील जनता कधीच माफ करणार नाही, असा घणाघातही थोरात यांनी केला.

“बिहार विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राच्या बदनामीचा नियोजनबद्ध कट कोणी रचला आहे, हे महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे. महाराष्ट्र विकास आघाडी सरकार विरोधात कारस्थाने करणारे आता महाराष्ट्र आणि मराठी माणसांविरोधात कट कारस्थाने करत आहेत. कंगनाचा बोलविता धनी कोण आहे? हे उघड असून आपल्या राजकीय स्वार्थासाठी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी महाराष्ट्राच्या मातीशी गद्दारी केली आहे”, असे थोरात म्हणाले.

ज्या मुंबईने आणि महाराष्ट्राने कंगना राणावतला काम, नाव, पैसा आणि प्रसिद्धी मिळवून दिली त्याच मुंबई आणि महाराष्ट्राची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणे हा कृतघ्नपणा आणि महाराष्ट्रातील १३ कोटी मराठी जनतेचा अपमान आहे. कंगनाने केलेल्या एकाही वक्तव्याचा भाजपने निषेध केला नाही. त्यांचे मौन हेच त्यांचा पाठिंबा असल्याचे दाखवत आहे. सुशांतसिंगच्या आत्महत्येचा मुद्दाही राजकीय करुन त्याचा लाभ उठवण्यासाठी महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावण्यापर्यंत या मंडळींची मजल गेली आहे, असा आरोप थोरात यांनी केला.