‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? येडियुरप्पा की फडणवीस?’

प्रदेश काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची मंगळवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीत राज्यातील पूरस्थितीबाबत चर्चा करण्यात आली. तसेच राज्य आणि केंद्र सरकारने राज्यातल्या पूरस्थितीकडे गांभीर्याने पाहिले नाही, असे बैठकीत आरोप हाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांनी केले.

Maharashtra
congress state prisident balasaheb thorat criticized on chief minister devendra fadnavis
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात

महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात महापूराने थैमान घातले होते. या महापूराच्या पाहणीसाठी मुख्यमंत्र्यांनी हवाई दौरा केला. पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातल्या पूरस्थितींची पाहणी ही कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यासोबत केली. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात घणाघाती टीका मुख्यमंत्र्यांवर केली. बाळासाहेब थोरात म्हणाले की, ‘पूरग्रस्त महाराष्ट्राला मदत देण्याबाबत केंद्र सरकार तर्फे पूर्णपणे अनास्था दिसत असून अद्यापही केंद्र सरकारने महाराष्ट्राला कोणतीही मदत दिली नाही. विरोधी पक्षांच्या रेट्यामुळे नाईलाजाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कर्नाटकचा हवाई दौरा करत असताना कोल्हापूर, सांगलीच्या पूराचे हवाई पर्यटन केले. परंतु इतिहासात पहिल्यांदाच असे घडले आहे की, महाराष्ट्रातल्या पूरस्थितींची पाहणी अमित शाह यांनी दुसऱ्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणजे कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या समवेत केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किंवा एकही मंत्री यावेळी त्यांच्यासमवेत नव्हते. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? येडियुरप्पा की फडणवीस? हे सरकारने स्पष्ट करावे.’

अद्याप राज्यातील पूराला एल ३ आपत्ती म्हणून जाहीर केले नाही

प्रदेश काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक मंगळवारी टिळक भवन येथे झाली. या बैठकीत राज्यातील पूरस्थितीबाबत चर्चा करण्यात आली. राज्य आणि केंद्र सरकारने राज्यातल्या पूरस्थितीकडे गांभीर्याने पाहिले नाही. म्हणून परिस्थिती वाईट झाली. केंद्र सरकारने अद्याप राज्यातील पूराला एल ३ आपत्ती म्हणून जाहीर केले नाही. त्यामुळे अद्याप केंद्राने राज्याला मदत दिली नाही. आता हळू हळू पूराचे पाणी ओसरू लागले आहे. पण आता स्वच्छता आणि आरोग्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. त्यासाठी सरकारने पावले उचलण्याची आवश्यकता आहे. सरकारची मदत सर्वांपर्यंत पोहोचत नसल्याने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे कार्यकर्ते १६ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट या कालावधीत पूरग्रस्त भागात स्वच्छता मोहिम राबवणार आहेत तसेच लोकांना मदत करणार आहे, असे पत्रकारांशी बोलताना आ. थोरात यांनी सांगितले.

पूरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर महाराष्ट्रातल्या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन साधे ट्वीटही केले नाही. या पूरामुळे लाखो लोक बेघर झाले आहे. पशुधन नष्ट झाले आहे. लोकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. या पूरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे आणि त्यांना नवीन कर्ज उपलब्ध करून द्यावे. बाजार भावाप्रमाणे पशुधनाच्या नुकसानीची भरपाई द्यावी. पडझड झालेली घरे सरकारने बांधून द्यावी, या आणि इतर मागण्यांसाठी उद्या बुधवारी काँग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे, असे देखील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी सांगितले.

सध्या महापूराचे पाणी हे ओसरले तरी पूरग्रस्त नागरिकांच्या अश्रूचा महापूर पाहायला मिळत आहे. या महापूराने खूप जणांचे संसार वाहून नेले आहेत. त्यामुळे आता पुन्हा संसार हा कसा उभा करणार हा महत्त्वाचा प्रश्न पूरग्रस्त नागरिकांसमोर आहे.