घरलोकसभा २०१९खडाजंगीनगरमध्ये विखे पाटील गट भाजपच्या बाजूने! सरचिटणीसांची घोषणा!

नगरमध्ये विखे पाटील गट भाजपच्या बाजूने! सरचिटणीसांची घोषणा!

Subscribe

अहमदनगरमधली निवडणूक काँग्रेससाठी जास्तच क्लिष्ट बनत चालली असून आता विखे पाटील गट देखील सुजय विखे पाटलांच्या बाजूने उभा राहिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसोबत काँग्रेसचे संबंध जिल्ह्यात बिघडण्याची शक्यता आहे.

अहमदनगरमध्ये सुरु असलेला वाद काही मिटता मिटत नसल्यामुळे काँग्रेससमोरच्या अडचणी वाढतच आहेत. आधीच खुद्द विरोधी पक्षनेत्यांच्या चिरंजीवांनी भाजपची वाट धरल्यामुळे अडचणीत आलेला काँग्रेसआता पुन्हा अडचणीत आला आहे. काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब हराळ यांनी स्वत: भाजपमध्ये गेलेल्या सुजय विखे पाटलांना पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे काँग्रेससमोर जिल्ह्यात नवंच आव्हान उभं राहिलं आहे. विशेष म्हणजे सुजय विखे पाटील आणि बाळासाहेब हराळ यांच्या भूमिकांमुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यातले संबंध देखील तणावपूर्ण झाल्याचं दिसू लागलं आहे.

काय आहे अहमदनगरचं गणित?

जागावाटपाच्या बोलणीमध्ये अहमदनगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्याच ताब्यात राहिली आहे. त्यामुळे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटील यांनी बंडखोरी करत भाजपमध्ये प्रवेश केला आणि तिथून उमेदवारी मिळवली. त्यामुळे जिल्ह्यातली काँग्रेसची मतं फुटणार हे तर नक्की झालं होतं. त्याची नांदी आता दिसली असून सुजय विखे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थिती लावून काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब हराळ यांनी विखे गटाचा पाठिंबा सुजय विखे पाटील यांनाच असेल असं जाहीर करून टाकलं आहे. त्यामुळे, जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांच्यापुढील समस्या वाढणार असल्या, तरी जिल्ह्यात प्रस्थ असलेले भाजपचे विद्यमान आमदार शिवाजी कर्डिले यांच्या गटाचा जगताप यांना पाठिंबा असल्यामुळे सुजय विखे पाटलांचं काम कठीण होऊन बसलं आहे. त्यामुळेच हराळ यांची घोषणा सुजय आणि पर्यायाने भाजपसाठी महत्त्वाची मानली जात आहे.

दोन्ही काँग्रेसमध्ये वाद का?

अहमदनगरच्या जागेचा वाद दोन्ही काँग्रेसमध्ये अगदी बाळासाहेब विखे पाटील यांच्यापासून सुरू आहे. त्यावरूनच सुजय यांनी घेतलेला निर्णय योग्य असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर देखील केलं होतं. त्यामुळे तेदेखील भाजपमध्ये जाणार असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. परंतु, आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. मात्र, नगरमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करणार नसल्याचं देखील ते म्हणाले आहेत. त्यामुळे भाजपमुळे नगरमध्ये दोन्ही काँग्रेसमध्ये नवीनच वादाची ठिणगी पडली हे निश्चित!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -