घरमहाराष्ट्रजिओच्या सेवेला लासलगावमध्ये ग्रहण

जिओच्या सेवेला लासलगावमध्ये ग्रहण

Subscribe

ग्राहक कमालीचे नाराज

 सर्वात स्वस्त मोबाईल सेवा देणार्‍या रिलायन्स जिओची सेवेला लासलगावमध्ये ग्रहण लागले आहे. जिओचे सीमकार्ड असलेल्या मोबाईलमधून फोनच लागत नसल्यामुळे अनेक ग्राहक जिओचे सिम कार्ड बंद करण्याच्या मार्गावर आहेत. लासलगाव शहरात कंपनीचे दोन मनोरे उभारले असून ते पूर्ण क्षमतेने काम देत नसल्याने जिओचे ग्राहक कमालीचे वैतागले आहेत. एकूणच लासलगाव शहरात रिलायन्स जिओ कंपनीचे तीन तेरा वाजले आहेत.

आज-काल मोबाईल कोणाकडे नाही ही परिस्थिती आहे त्यातच रिलायन्स जिओने आगमन करताना कमी दरात सेवा देण्यास प्रारंभ केल्यानंतर अनेकांनी इतर खाजगी कंपन्या बंद करून आपले सिमकार्ड जिओ कंपनीत वर्ग केले. जिओ कंपनीची सेवा सुरळीत व चांगली सुरू असताना लासलगाव शहरात मात्र ही सेवा अतिशय डगमळीत झाली आहे. सुरुवातीला अतिशय वेगाने पळणारे जिओचे सिम आता कासवगतीने सुरू असल्याने युवा वर्गात मोठी चीड निर्माण होत आहे.

- Advertisement -

रिलायन्स जिओ कंपनी लासलगाव शहरात फोर जी सेवा देत असली तरी टू जी पेक्षाही कमी स्पीड मिळत असल्याने रिलायन्स जिओच्या सेवेचा बोजवारा उडाला आहे. लासलगाव शहरातील मोठी जिओची ग्राहक संख्या पाहता अनेकांनी जिओचे कार्ड बंद करून तोच क्रमांक दुसर्‍या कंपनीमध्ये रूपांतर करण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

जिओ कंपनीच्या मोबाईल मधून फोटो डाऊनलोड करणे अवघड झालेले असतानाच त्यावरून संभाषण करताना अनेक अडथळे पार करावे लागत आहेत. एकाच व्यक्तीशी बोलण्याकरीता तीन ते चार वेळा फोन करूनही बोलणे होत नसल्याने जिओच्या ग्राहकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. लासलगाव शहरात कासवगतीने सुरू असलेल्या जिओ सीमकार्डची चांगली सुविधा पुन्हा कधी मिळणार? या प्रतीक्षेत लासलगावमधील जिओचे ग्राहक असून शहरातील मनोर्‍यांची संख्या तातडीने वाढवून चांगली सुविधा मिळावी, या अपेक्षेत नागरिक आहेत.

- Advertisement -

३ ते ४ हजार ग्राहकांना सोसावा लागतोय मनस्ताप…..
लासलगाव शहरात रिलायन्स जिओ ग्राहक संख्या ३ ते ४ हजार आहे. लासलगाव बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतमालाची आवक होत असते. यातील अनेक शेतकर्‍यांनी जिओ सेवा घेतली आहे. ते लासलगाव शहरात आल्यावर त्यांचेही बोलणे होत नसल्याने व इंटरनेट सेवा मिळत नसल्याने नाराजीचा सूर ऐकायला मिळत आहे.

मनोर्‍यांची संख्या वाढवा…….
लासलगाव शहराचे वाढलेले विस्तारीकरण व रिलायन्स जिओ ग्राहक संख्या पाहता मनोर्‍यांची संख्या वाढवली तर चांगली सेवा मिळेल असा आशावाद ग्राहकांना आहे. शहरात काही ठराविक भागात चांगली सेवा मिळत असली तरी इतर ठिकाणी सेवेच्या नावे बोंबाबोंब आहे.

बॅलन्स टाकण्यासाठी खुप प्रयत्न करावे लागतात – नटवर डागा, जिओ रिटेल
रिलायन्स जिओ संदर्भात अनेक ग्राहक तक्रारी करत आहेत. अनेकांचे बोलणे होत नसून इंटरनेट सेवादेखील अत्यंत खराब मिळत असल्याच्या अनेक तक्रारी आहे. ग्राहकांना बॅलन्स पाठवताना देखील खूप अडचणी येत असून ग्राहक सध्या जिओबाबत समाधानी नसल्याचे बोलून दाखवत आहेत.

सिमकार्ड बदलणार- दगू नवले , रिलायन्स जिओ ग्राहक.
रिलायन्स जिओ सुरू झाल्यापासून मी त्यांचा ग्राहक आहे; मात्र गेल्या दोन महिन्यांपासून लासलगाव शहरात इंटरनेट सेवेचा बोजवारा उडाला आहे. ज्यावेळी गरज असते त्यावेळी इंटरनेटचा उपयोग होत नसल्यामुळे रिलायन्स जिओच्या कार्डचे रूपांतर दुसर्‍या कंपनीत करण्याचा निर्णय घेतला आहे.

मागील लेख
पुढील लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -