Unlock मुळेच संसर्ग वाढतोय – राजेश टोपे

Rajesh Tope Health Minister

राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये अनेक गोष्टी खुल्या करण्यात आलेल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून म्हणजेच गेल्या ५ महिन्यांपासून राज्यात विविध टप्प्यांवर लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्यात आला होता. त्यामध्ये अनेक गोष्टींवर निर्बंध घातले होते. मात्र, आता हे निर्बंध हळूहळू उठवण्यात येत असून त्यामुळेच कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. संपर्कातून कोरोनाचा संसर्ग वाढतो, असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) म्हणाले आहेत. अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी आणि बुडालेल्या उद्योगधंद्यांना आणि रोजगाराला पुन्हा चालना देण्यासाठी हे निर्बंध टप्प्याटप्प्याने काढले जात आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातल्या रुग्णांची संख्या देखील वाढताना पाहायला मिळत असल्यामुळे सर्वच स्तरातून चिंता व्यक्त केली जात आहे.

काय म्हणाले राजेश टोपे?

राज्यात सातत्याने वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येविषयी (Corona Active Patients) विचारलं असता राजेश टोपेंनी वरील उत्तर दिलं. ‘आपण टप्प्याटप्प्याने अनलॉक करत आहोत. ज्या काही गोष्टी अजूनही बंद होत्या, त्यातल्या बऱ्याच गोष्टी आपण सुरू केल्या आहेत. ई-पास, प्रवासाची परवानगी, राज्यात ट्रेन प्रवासाची मुभा, एसटी वाहतुकीला परवानगी अशा गोष्टी आपण सुरू केल्या. त्यातून लोकांचा संपर्क वाढला. त्याचा एकूण परिणाम म्हणून संसर्ग वाढतोय. संपर्कामुळेच तो संसर्ग वाढतोय’, असं राजेश टोपे म्हणाले. तसेच, ‘लोकांनी काळजी घेणं फार आवश्यक आहे. कोरोनाची लस येईपर्यंत लोकांनी बाहेर पडताना, फिरताना सतर्क राहायला हवं’, असं देखील टोपे म्हणाले.

राज्यात आत्तापर्यंत वाढलेल्या कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहाता वाढती रुग्णसंख्या धडकी भरवणारी आहे. राज्यातल्या एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ८ लाख ८३ हजार ८६२ इतका झाला आहे. त्यात २ लाख २० हजार ६६१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आत्तापर्यंत २६ हजार २७६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.