कोरोनाचा कोंबड्यांशी संबंध नाही, बिनधास्त खा; पशुसंवर्धन विभागानं केलं स्पष्ट!

chicken leg piece

महाराष्‍ट्र राज्‍य कुक्‍कुटपालन व्‍यवसायामध्‍ये देशात अग्रेसर आहे. सन २०१९ च्‍या पशुगणनेनुसार राज्‍यामध्‍ये कोंबड्यांची एकूण संख्‍या सुमारे ७ कोटी ४२ लाख इतकी आहे. कोंबड्यांमध्ये होणारे विविध रोग व त्‍याचे नियंत्रण करणे, हा सदर व्‍यवसायामध्‍ये यशस्‍वी होण्‍याचा सर्वात महत्‍त्‍वाचा मूलमंत्र आहे. कोरोना प्रार्दुभावाच्‍या अनुषंगाने गेल्‍या काही दिवसांपासून समाज माध्‍यमांवर (सोशल मिडीया) कोंबडीचे मांस आणि इतर कुक्‍कुट उत्‍पादने यांच्‍या आहारातील उपयोगाबाबत विविध अशास्‍त्रीय अफवा पसरविल्‍या जात आहेत. कोंबडीचे मांस व कुक्‍कुट उत्‍पादने यांचा कोरोना प्रार्दुभावाशी कोणताही संबंध नाही. ते आहारामध्‍ये वापरण्‍यासाठी पूर्णपणे सुरक्षित असून नागरिकांनी या अफवांकडे दुर्लक्ष करावे व याबाबत काही शंका असल्‍यास पशुसंवर्धन विभागाशी संपर्क करावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्‍या पुणे येथील पश्चिम विभागीय रोगनिदान प्रयोगशाळा व रोग अन्‍वेषण विभाग यांनी जारी केलेल्‍या परिपत्रकान्‍वये करण्‍यात आले आहे.

राज्‍यातील कुक्‍कुट पालन व्‍यवसायाशी लाखो शेतकऱ्यांचे चरितार्थ व हित निगडीत आहेत. मका व सोयाबीन उत्‍पादक शेतकरी विशेषत: कुक्‍कुट पालन उद्योगाशी संलग्‍न आहेत. तसेच कुक्‍कुट व्‍यवसाय राज्‍याच्‍या विकासाशी जोडलेला आहे. कोंबडीचे मांस व कुक्‍कुट उत्‍पादने यांच्‍या सेवनामुळे कुणाला कोरोनाचा संसर्ग झाल्‍याचे संदर्भ नाहीत. आपल्‍याकडे चिकन व मटण उकळून शिजवून सेवन केले जाते व त्‍या तापमानात कुठलेही विषाणू जिवंत राहू शकत नाहीत.

कोंबडीतील कोरोना विषाणू (इन्‍फेक्‍शीअस ब्राँकायटिस) मानवामध्‍ये संक्रमीत होत नसल्‍याबाबत शास्‍त्रीय संदर्भ आहेत. तरी ग्राहकांनी समाज माध्‍यमांद्वारे (सोशल मिडीया) प्रसारित किंवा फॉरवर्ड करण्‍यात येणा-या चुकीच्‍या माहितीवर किंवा अफवांवर विश्‍वास ठेवू नये. आपल्‍याकडील कुक्‍कुट मांस व कुक्‍कुट उत्‍पादने यांचा ‘नोव्‍हेल करोना विषाणू’ शी संबंध नाही व ती आहारात वापरण्‍यासाठी पूर्णत: सुरक्षि‍त आहेत. अशीही माहिती महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या पशुसंवर्धन आयुक्‍तालयाद्वारे देण्‍यात आली आहे.