CoronaVirus : लॉकडाऊनमध्ये काय सुरू काय बंद? गोंधळ उडालाय? इथे वाचा!

देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान काय सुरू राहील आणि काय बंद राहील याविषयी बराच संभ्रम निर्माण झाला आहे. यासंदर्भात केंद्रीय गृह विभागाने सविस्तर पत्रकच जाहीर केलं आहे.

Mumbai
corona india lockdown

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात लॉकडाऊनची घोषणा केली. त्यामुळे करोनाचं संकट देशावर किती गहिरं झालं आहे, याची देशबांधवांना खात्रीच पटली. पुढचे २१ दिवस हा लॉकडाऊन राहणार आहे. पण मोदींनी घोषणा केल्यानंतर लगेचच लोकांनी किराणा, भाजीपाल्याच्या दुकानांमध्ये धाव घेत खरेदीसाठी गर्दी केली आणि करोनाला हरवण्यासाठी गर्दी न करण्याच्या सरकारच्या आवाहनाला, संचारबंदीच्या नियमाला हरताळ फासला. शेवटी सरकारला पुन्हा एकदा फेसबुक किंवा इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर करावं लागलं की लॉकडाऊन असला तरी यादरम्यान जीवनावश्यक वस्तू किंवा सेवा यांचा पुरवठा सुरूच राहणार आहे. पण अजूनही लोकांमध्ये जीवनावश्यक वस्तू आणि सेवा म्हणजे नक्की कोणत्या? असा प्रश्न पडला आहे. याबद्दल मोठा संभ्रम देखील दिसून येतो. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लॉकडाऊनच्या घोषणेनंतर खुद्द केंद्रीय गृहमंत्रालयानेच या वस्तू आणि सेवांची यादी जाहीर केली आहे!

आधी काय बंद राहणार ते पाहू…

१) या काळात केंद्र सरकारची सर्व कार्यालये, सहकारी संस्था, स्वायत्त संस्थांची कार्यालये बंद राहतील…

२) या काळात राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश, त्यांच्या स्वायत्त संस्था आणि सहकारी संस्थांची कार्यालये बंद राहतील..

३) व्यावसायिक संस्था आणि कंपन्यांची कार्यालये बंद राहतील…

४) हवाई, रस्ते, रेल्वे वाहतूक बंद राहील

५) हॉटेलिंग, लॉजिंगच्या सुविधा बंद राहतील

६) सर्व प्रकारच्या शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन संस्था बंद राहतील

७) सर्व प्रकारची धार्मिक स्थळं, तिथले लोकांना एकत्र आणणारे विधी बंद राहतील

८) सर्व प्रकारचे क्रीडा, राजकीय, सामाजिक, मनोरंजनात्मक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम बंद राहतील

९) जर कुणाचा मृत्यू झाला, तर २० पेक्षा जास्त लोकांना अंतिम विधीसाठी एकत्र जमता येणार नाही…

आता महत्त्वाचा भाग, काय सुरू राहणार ते पाहू…

१) केंद्र सरकारच्या अखत्यारीतील – संरक्षण, सीआरपीएफ, टांकसाळी, पेट्रोलियम-एलपीजी-सीएनजी-पीएनचीसारखे उत्पादक, आपातकालीन यंत्रणा, वीज उत्पादन आणि वितरण, पोस्ट ऑफिस, राष्ट्रीय माहिती केंद्र आणि आपत्तीपूर्व सतर्कता यंत्रणा… (कमीत कमी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ही कार्यालये काम करतील)

२) राज्य सरकारांच्या अखत्यारीतील – पोलीस, होम गार्ड्स, अग्निशमन दल, आपातकालीन सेवा, आपत्ती व्यवस्थापन विभाग, तुरुंग, जिल्हा प्रशासन, ट्रेजरी (सरकारी तिजोरी), वीज व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, स्वच्छता विभाग, महानगर पालिकेचे स्वच्छता-पाणीपुरवठ्यासारखे विभाग…(कमीत कमी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ही कार्यालये काम करतील)

३) हॉस्पिटल आणि त्यांच्याशी संबंधित सर्व प्रकारची आरोग्य यंत्रणा, खासगी आणि सरकारी क्षेत्रातील औषध उत्पादन आणि वितरण व्यवस्था, मेडिकल, केमिस्ट्स, मेडिकल सामग्रीची दुकानं, प्रयोगशाळा, लॅब्स, क्लिनिक्स, नर्सिंग होम, अॅम्बुलन्स… शिवाय या सर्व ठिकाणी उपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आणि रुग्णांच्या वाहतुकीला परवानगी असेल..

४) रेशनिंगची दुकानं, किराणा मालाची दुकानं, अन्नधान्य पुरवणारी दुकानं, फळं-भाजीपाला विक्री, दूध आणि दुग्धजन्य उत्पादनं, मांस आणि मासे, प्राण्यांच्या खाद्याची दुकानं सुरू राहतील. यासंदर्भात राज्य सरकारे या सर्व बाबतीत होम डिलिव्हरीचा निर्णय देखील घेऊ शकतात…

५) बँका, इन्शुरन्सची कार्यालये, एटीएम, खासगी सुरक्षा सेवा

६) वर्तमानपत्रे आणि टीव्ही आदी प्रसारमाध्यमे, स्टॉक मार्केट, निफ्टी, सेन्सेक्स…

७) फोनसारख्या संपर्क यंत्रणा, इंटरनेट, प्रसारण आणि केबल यंत्रणा, जीवनावश्यक सुविधांशी संबंधित आयटी सेवा..

८) ऑनलाईनच्या माध्यमातून मागवल्या जाणाऱ्या आणि पुरवल्या जाणाऱ्या अन्न-औषध आणि मेडिकल इक्विपमेंटसारख्या गोष्टी…

९) पेट्रोल पंप, एलपीजी, पेट्रोलियम आणि गॅसची विक्री आणि साठवणाची ठिकाणं…

१०) जीवनावश्यक गोष्टींचं उत्पादन करणारे कारखाने..याशिवाय प्रक्रिया करणारे कारखारने, ज्यात उत्पादनासाठी जास्त कालावधी लागतो…यासाठी राज्य सरकारची रीतसर परवानगी आवश्यक

११) जीवनावश्यक वस्तू आणि सेवा पुरवणाऱ्या व्यक्तींची वाहतूक, अग्निशमन, कायदा आणि सुव्यवस्थेसारख्या महत्त्वाच्या सेवांसाठीची वाहतूक सुरूच राहील

१२) क्वॉरंटाईन सुविधेसाठी वापरण्यात येणारी हॉटेल्स, लॉज, मोटेल्स सुरू राहतील. याशिवाय, लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या किंवा आरोग्य वा आपातकालीन सेवा पुरवणाऱ्या लोकांसाठी उपयोगात येणारी हॉटेल, लॉजिंग किंवा मोटेल्स सुरू राहतील…

१३) १५ फेब्रुवारीनंतर भारतात आलेल्या आणि होम किंवा इन्स्टिट्युशनल क्वॉरंटाईन सांगितलेल्या व्यक्तींनी नियम मोडल्यास त्यांना आयपीसीच्या कलम १८८ नुसार शिक्षा होईल..

दरम्यान, याव्यतिरिक्त वर्क फ्रॉम होमची सुविधा खासगी आणि सरकारी अशा सर्वच क्षेत्रातल्या सर्वांसाठी सुरू ठेवण्याला
परवानगी आहे.


हेही वाचा – पुढचे २० दिवस महत्त्वाचे असतील-उद्धव ठाकरे

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here