विधानभवनात फिरला कोरोना पॉझिटिव्ह अधिकारी

vidhan bhavan

कोरोनाच्या संकटात विधिमंडळाचं दोन दिवसांचं पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू झालं असून एक्क धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोनाची लागण झालेला कक्ष अधिकारी विधानभवनात मुक्त संचार केल्याचं वृत्त आहे. या वृत्ताने एकच खळबळ माजली आहे. दरम्यान, याप्रकरणाची चौकशी करीत आहे.

कोरोनाच्या धर्तीवर काल पासून सुरु झालेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी येणारे आमदार तसेच अधिकाऱ्यांची आधीच कोरोना चाचणी करून अहवाल निगेटिव्ह आलेल्यांनाच प्रवेश देण्यात येत आहे. अधिवेशनात संसदीय कामकाज विभागातील हा अधिकारी सकाळी विधानभवनात जाण्यासाठी आला. पण त्याचा कोरोना चाचणीचा अहवाल आला नसल्यामुळे त्याला प्रवेश नाकारण्यात आला. अधिवेशनात ज्यांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे, त्यांच्या पासवर फुली मारुन त्यांना प्रवेश दिला जात आहे. दरम्यान, या अधिकाऱ्याने अहवाल आलेला नसतानाही स्वत: च त्याच्या प्रवेश पासावर मार्करने फुली मारली आणि विधानभवनात प्रवेश केला. त्यानंतर हा अधिकारी दिवसभर कामानिमित्त विधानभवनात अनेक ठिकाणी फिरल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, दुपारी ३ वाजता या अधिकाऱ्याच्या कोरोना चाचणीचा अहवाल आला. या अहवालात त्याला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत हा अधिकारी विधानभवनातील गॅलरी आणि इतर ठिकाणी फिरला. विधानभवनात प्रधान सचिवांना भेटला, अधिकाऱ्यांच्या गॅलरीत बसला शिवाय सभागृहाचे कामकाज संपल्यानंतरही मंत्र्यांच्या दालनात फिरला असल्याची माहिती आहे.