Coronavirus: वादळ टळलं पण कोरोनाचं काय? आज राज्यात सर्वाधिक १२२ मृत्यू

महाराष्ट्रात आज सर्वाधिक मृत्यूंची नोंद झाली आहे.

Mumbai
Coronavirus Update Maharashtra 3 June
महाराष्ट्राची आजची आकडेवारी

निसर्ग चक्रीवादळाचा धोका आज सकाळपासून महाराष्ट्रावर घोघांवत होता. या वादळामुळे खूप नुकसान होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र सुदैवाने वादळाने फार हानी केली नाही. मात्र कोरोनाने आपला कहर सुरुच ठेवला आहे. आज राज्यात सर्वाधिक १२२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. यापुर्वी ११६ रुग्णांचा एका दिवसांत मृत्यू झाल्याची नोंद होती. त्यानंतर एकादिवसात सर्वाधिक मृत्यू होण्याची ही दुसरी वेळ ठरली आहे. आज राज्यात २५६० नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७४,८६० झाली आहे. राज्यात आज रोजी एकूण ३९,९३५ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ७१ पुरुष तर ५१ महिला आहेत. आज नोंद झालेल्या १२२ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ६९ रुग्ण आहेत तर ४६ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ७ जण ४० वर्षांखालील आहे. या १२२ रुग्णांपैकी ८८ जणांमध्ये ( ७२ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २५८७ झाली आहे.

आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ५७ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू ३० एप्रिल ते ३१ मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ६५ मृत्यूंपैकी मुंबई ३०,सोलापूर -१०, औरंगाबाद -६, नवी मुंबई -३, धुळे -३, जळगाव -२, कोल्हापूर -२, ठाणे २, अहमदनगर -१, अकोला १, नंदूरबार -१,पुणे १ , उल्हासनगर १, वसई विरार -१ आणि उत्तर प्रदेशमधील १ असे आहेत.