Coronavirus in Maharashtra: कोरोना रुग्णांचे आजचे आकडे काळजी वाढविणारे

Maharashtra Live Update Covid stat
महाराष्ट्रातील आजची कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी

गेल्या काही काळापासून मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने घसरत होती. मात्र दिवाळीनंतर देशभरात चित्र पालटल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रातही सलग तिसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येने पाच हजारांचा आकडा ओलांडला आहे. आज राज्यात ५ हजार ६४० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज दिवसभरात १५५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज ६९४५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आज राज्याने १ कोटी चाचण्यांचा टप्पा ओलांडला. राज्यात आजपर्यंत एकूण १६ लाख ४२ हजार ९१६ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.८९ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ३५ हजार ६६५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ लाख ६८ हजार ६९५ (१७.६२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ५८ हजार ०९० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,८८३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यातील ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या कमी होऊन ७८ हजार २७२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

दिल्लीमध्ये कोरोनाची लाट पुन्हा आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात जी परिस्थिती होती, तशीच भयावह परिस्थिती पुन्हा एकदा दिल्ली येथे दिसू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातही पुन्हा एकदा खबरदारीचे उपाय घेतले जात आहेत. दिवाळीच्या दरम्यान खरेदीसाठी लोकांनी एकच गर्दी केली होती. त्यामुळे आता आरोग्याचे प्रश्न उभे राहिले आहेत.