Sunday, August 9, 2020
Mumbai
29.1 C
घर CORONA UPDATE Corona Live Update: कल्याण-डोबिंवली पालिकेच्या उपायुक्तांसह कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण!

Corona Live Update: कल्याण-डोबिंवली पालिकेच्या उपायुक्तांसह कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण!

New Delhi
corona live update
कोरोना व्हायरस लाईव्ह अपडेट

केडीएमसी भागात कोरोनाने बाधित होणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यातच आज पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्तांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाल्याने पालिका वर्तुळात खळबळ उडाली. विशेष म्हणजे आरोग्य विभागातील रिक्त असलेल्या वॉर्डबॉयच्या पदासाठी काल त्यांनी मुलाखती घेतल्या होत्या. कधी नव्हे ते या मुलाखतीसाठी उमेदवारांनी तोबा गर्दी केली होती. तब्बल १५०० उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे अनेक कर्मचारी काम करत होते तर सर्व उमेद्वाराचे अर्ज उपायुक्तांनी स्वतः हाताळल्याने कर्मचाऱ्यांसह उमेद्वारांमध्येही चिंतेचे वातावरण पसरले आहे. दरम्यान उपायुक्तांचा अहवाल पॉझिटिव्ह येताच खबरदारी म्हणून आज महापालिका मुख्यालय बंद ठेऊन निर्जंतुकीकरण करण्यस सुरुवात केली आहे.


गोव्यात आज ९४ नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. त्यामुळे गोव्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १ हजार ५७६वर पोहोचला असून यापैकी ८०० रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तर ७७२ रुग्ण रिकव्हर झाले आहेत. तसेच आतापर्यंत ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती गोव्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.


मुंबईत गेल्या २४ तासांत १ हजार ३७२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून ७३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ८१ हजार ६३४वर पोहोचला असून आतापर्यंत यापैकील ४ हजार ७५९ जणांचा मृत्यू झाला आहे.


राज्यात मागील २४ तासांत सर्वाधिक ६ हजार ३६४ कोरोनाबाधित नव्या रुग्णांची वाढ झाली अशून १९८ मृतांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख ९२ हजार ९९०वर पोहोचला असून मृतांचा आकडा ८ हजार ३७६ झाला आहे. सविस्तर वाचा 


अंबरनाथमध्ये कोरोनाचे १०१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत अंबरनाथमध्ये कोरोनाचे २०३२ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ५७ जणांचा मृत्यू झाला आहे. उपचारानंतर १५१४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. तर ४६१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पूर्व भागातील ६० वर्षीय इसमाचा, पश्चिम भागातील ७० वर्षीय इसमाचा आणि पूर्व भागातील ४७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.


धारावीत आज ८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकूण बाधितांचा आकडा २ हजार ३०९वर पोहोचला आहे. तर आज दादरमध्ये २७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून एकूण बाधितांचा आकडा ९१४वर पोहोचला आहे. तसेच आज माहिममध्ये ३४ कोरोनाबाधित नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे माहिममधील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १ हजार १९०वर पोहोचला आहे.


तामिळनाडूतील कोरोनाबाधित आकडा १ लाख पार झाला आहे. आज तामिळनाडूत ४ हजार ३२९ नव्या कोरोनाबाधितांचा नोंद झाली असून ६४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तामिळनाडूतील कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख २ हजार ७२१वर पोहोचला आहे. तसेच मृतांचा आकडा १ हजार ३८५ झाला आहे, अशी माहिती तामिळनाडूच्या आरोग्य विभागाने दिली आहे.


कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता तूर्तास गणेशोत्सव कालावधीपर्यंत शाळा सुरू केल्या जाणार नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरच शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी मालवण पंचायत समिती बैठकीत दिली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शाळा बंद आहेत. अनेक शाळेत मुंबईसह परजिल्ह्यातून आलेले क्वारंटाईन आहेत. पुढील महिन्यात होणाऱ्या गणेशोत्सव पार्श्वभूमीवर काही दिवस आधीच चाकरमानी गावात येण्याची शक्यता आहे. अशी स्थिती असताना शाळा सुरू करण्याबाबत शाळा व्यवस्थापन समितीचे अहवाल शिक्षण विभागाने मागवले. या पार्श्वभूमीवर गटनेते सुनील घाडीगांवकर यांनी आक्रमक होत सद्यस्थितीत शाळा सुरू करणे धोक्याचे ठरेल अशी भूमिका मांडली. यावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सद्यस्थितीत प्राथमिक, माध्यमिक कोणत्याही शाळा सुरू केल्या जाणार नाहीत असे स्पष्ट केले आहे.


शहरातील स्व इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालय सुसज्ज करण्याकरिता प्रयत्न करणार आहे. हॉस्पिटलमध्ये अत्यावश्यक सेवा देणारे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, स्टाफ नर्स, लॅब कर्मचारी यांची रिक्त पदे तातडीने भरून या हॉस्पिटल मधील पूर्ण क्षमता वाढवणार आहे. हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने चालू राहील याची दक्षता घेतली जाणार आहे. ऑरेंज हॉस्पिटल भाड्याने घेतले असून तेथे अन्य रुग्णावर उपचार सुरू आहे. त्याकडे देखील लक्ष देण्यात यावे. अपुरा असलेला कर्मचारी वर्ग, वैद्यकीय अधिकारी यांची देखील व्यवस्था करण्यात याव्यात, अशा सूचना वैद्यकीय आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. वैद्यकीय आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोरोना विषाणूच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भिवंडीत भेट देऊन कोरोना परिस्थितीबाबत बैठक घेतली. यावेळी महापौर प्रतिभा पाटील, ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, महापालिका आयुक्त डॉक्टर पंकज आशिया, भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख, आरोग्य विभागाच्या सहाय्यक संचालक गौरी राठोड, ठाणा सिव्हील सर्जन कैलास पवार, महापालिका सभागृहनेते विलास पाटील, उपमहापौर इमरान खान, स्थायी समिती सभापती हलीम अंसारी, अन्य अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते. मंत्री टोपे यांनी कोरोना महामारीचा आढावा घेतल्यावर भिवंडी शहरात कोरोना टेस्टिंग लॅब करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. तर शहरांमधील खासगी वैद्यकीय व्यावसायिक आहेत. त्यांनी त्यांचे दवाखाने चालू राहतील याकरता प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्याकरिता प्रत्येक दवाखान्याकरिता पीपीई कीट उपलब्ध करून द्या. त्यासाठी पंधरा लाख रुपये खर्च मंजूर करण्यास मान्यता देण्यात आली.

काय म्हणाले राजेश टोपे?

खासगी वैद्यकीय व्यावसायिक त्यांचे सहकार्य घेणे आवश्यक असल्याचे नमूद करून जर त्यांचे सहकार्य मिळाले नाही तर त्यांच्याविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा व पालिका प्रशासनास दिल्या आहेत. तसेच शहरातील युनानी व आयुर्वेदिक व्यावसायिक यांना देखील या कार्यात सहभागी करून घेण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. पालिकेच्या ज्या कर्मचारी वर्गांना पेमेंट कमी वाटत असेल त्या पेमेंटची कमतरता भरून देण्यासाठी प्रस्ताव सादर करा. शहरांमध्ये अँटीजन टेस्ट करा. अर्धा तासात कोरोनाचा रिपोट देत असल्यामुळे टेस्ट सुरू करा, मोहल्ला क्लीनिक सुरू करा. मोहल्ला क्लीनिक मध्ये साधारण रुग्णावर प्रथम उपचार होणे आवश्यक आहेत, जेणेकरून रुग्णाची स्थिती खराब होणार नाही. कोरोना करता ( covid-19) हॉस्पिटल चालू करताना आपण ऑरेंज हॉस्पिटल चालवायला घेतलेले आहे हे लक्षात घेऊन या हॉस्पिटलमध्ये देखील चांगल्याप्रकारे रूग्णांवर उपचार होणे आवश्यक आहे. गर्भवती महिलांना उपचार न करता दुसरीकडे पाठवले जाते हे योग्य नाही. सर्वांवर उपचार होणे आवश्यक आहे. तसेच शहरातील किमान चार हॉस्पिटलचा समावेश महात्मा ज्योतिबा फुले योजनेचा समावेश करून रुग्णालयात सर्व रुग्णांना मोफत उपचार करा. ठाणा सिव्हील हॉस्पिटलमध्ये सर्व रुग्णांना दाखल करण्याची क्षमता आहे कोणत्या रुग्णाला उपचार न करता परत पाठवता येणार नाही. शहरामधील नागरिकांमध्ये कोरोना बाबत जागरुकता निर्माण होणे आवश्यक आहे. नागरिकांनी मास्क लावणे व सामाजिक अंतर ठेवण्याचा यापूर्वी सूचना पूर्वी दिलेले आहेत त्याचे तंतोतंत पालन करावे त्यानुसारच आपण कोरोना आजारावर नियंत्रण मिळवू शकू, तरच कोरोनावर मात करू शकतो, यासाठी नागरिकांच्या देखील सहकार्य मिळणे आवश्यक आहे. अशा प्रकारच्या सूचना मंत्री राजेश टोपे यांनी सर्व प्रशासनाला दिलेल्या आहेत. या प्रसंगी राष्ट्रवादी महिला अध्यक्षा स्वाती कांबळे यांनी भिवंडीच्या विविध समस्या बाबत मंत्री टोपे यांना निवेदन दिले.


देशात पुन्हा एकदा सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. मागील २४ तासांत देशात २० हजार ९०३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून ३७९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ६ लाख २५ हजार ५४४ वर पोहोचली असून मृतांची संख्या १८ हजार २१३ झाली आहे. तसेच २ लाख २७ हजार ४३९ active केसेस असून ३ लाख ७९ हजार ८९२ जण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.


राज्यात आज ८ हजार १८ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण १ लाख १ हजार १७२ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रिकव्हरी रेट हा ५४.२१ टक्के एवढा झाला आहे. तसेच आज सर्वाधिक ६ हजार ३३० नव्या कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १२५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा १ लाख ८६ हजार ६२६वर पोहोचला असून ८ हजार १७८ मृतांचा आकडा झाला आहे.