मका उत्पादकांनाही कोरोनोचा फटका

पोल्ट्री खाद्याच्या बाजारभावात घसरण सुरूच, अफवांमुळे चिकन खरेदी मंदावली

Mumbai

चीनमध्ये धुमाकूळ घातलेल्या कोरोना व्हायरसचा तडाखा थेट मका उत्पादकांनाही बसला आहे. कोरोना आणि पोल्ट्री उत्पादनांचा कोणताही संबंध नसतानाही, सोशल मीडियामधून पसरलेल्या अफवांमुळे चिकन विक्रीवरही मोठा परिणाम झाला आहे. या अनुषंगाने पोल्ट्री खाद्याच्या मागणीसह बाजारभावातही मोठी घट झाली आहे.

जानेवारी महिन्यात २००० रुपये प्रति क्विंटल असलेले मक्याचे बाजारभाव आज सर्वसाधारण १३२० रुपये प्रति क्विंटलपर्यंत घसरले असून, घसरण सुरूच आहे. कोंबडी खाद्य बनवण्यासाठी मक्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. कोरोना हा चिकनमुळे पसरत असल्याची अफवा पसरताच चिकन खरेदीवर याचा मोठा परिणाम झाला आहे. याचा थेट संबंध मका पिकाशी असल्याने मागणी घटून बाजारभावावर त्याचा परिणाम झाला आहे. यंदा प्रारंभीच्या काळात अत्यल्प पर्जन्यमान, लष्करी अळीचा हल्ला आणि शेवटच्या काळात परतीच्या पावसाचा तडाखा या सर्व संकटांच्या विळख्यातून मका उत्पादक सावरत असतानाच आता कोसळणार्‍या बाजारभावाला सामोरे जात आहे. रब्बी हंगामातील कामे आवरून शेतकरी मका विक्रीकडे वळत असतो. मक्याचे बाजारभावाचे संकट समोर येऊन ठेपले आहे.

एरव्ही मक्याचे दर दिवसेंदिवस थोडे थोडे वाढत असतात. याचा फायदा उशिरा मका विक्री करणार्‍या उत्पादकांना मिळत असतो. मात्र, सद्यस्थितीत जवळपास ३५ ते ४० टक्के मका उत्पादकांकडे मका शिल्लक आहे. बाजारभावात दिवसेंदिवस होणार्‍या घसरणीने मका उत्पादक चिंतातुर झाला आहे. देवळा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सोमवारी (दि.१७) किमान १२०० आणि कमाल ४००, तर सर्वसाधारण १३२० याप्रमाणे मक्याची खरेदी झाली. तर, भऊर येथील स्वप्निल अ‍ॅग्रो कंपनीवर उत्तम दर्जाचा मका अधिकाधिक १५४०, सर्वसाधारण १५२०, कमीतकमी १५०० या प्रमाणे खरेदी झाला. जानेवारी महिन्याच्या तुलनेत जवळपास ६८० ते ७०० रुपये प्रति क्विंटल दराने घसरण झाली आहे. परिणामी मका उत्पादन शेतकरी वर्गाचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

…अन्यथा पोल्ट्री व्यवसायावर गंडांतर
सोशल मीडियावर एक चुकीची गोष्ट शेअर केल्याने त्याचे किती मोठे परिणाम भोगावे लागतात याचे कोरोना व्हायरस हे उदाहरण आहे. या विळख्यातून बाहेर येण्यासाठी आता शासनाच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करणे गरजेचे आहे. अन्यथा मका उत्पादक व शेतीला जोडधंदा म्हणून ओळख असलेला पोल्ट्री व्यवसाय लयास जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्रासह बाहेर राज्यात मक्याची मागणी नसल्याने दिवसेंदिवस मका बाजारभावात घसरण सुरूच आहे. प्रत्येक दिवशी बाजारभावात घसरण होत असल्याने बाहेर पाठवलेला माल पुढील व्यापारी खाली करून घेत नाही. बर्ड फ्लू काळात सुध्दा इतका मोठा परिणाम मका व्यापारात दिसून आला नव्हता जो आता काहीएक संबंध नसलेल्या कोरोना व्हायरसमुळे दिसून येत आहे. बाजारभावात दिवसेंदिवस होणारी घसरण पाहता व्यापार कसा करावा असा प्रश्न निर्माण झाला आहे.
– प्रेम खैरनार, मका व्यापारी देवळा

कोरोना व्हायरसबाबत सोशल मीडियावरून अनेक अफवा पसरवण्यात आल्याचा परिणाम चिकन व्यवसायावर झाला. ग्राहकांनी चिकन खाणे बंद केल्याने ७२ ते ७५ रुपये दराने विकला जाणारा माल केवळ ३५ रुपयाने विकावा लागत असून, त्यालाही उठाव नसल्याने कोंबडी खाद्य उत्पादन व्यवसाय व पोल्ट्री व्यवसाय ठप्प झाला आहे. परिणामी मक्याच्या बाजारभावात घसरण सुरूच आहे.
– अरुण पवार, संचालक, स्वप्निल अ‍ॅग्रो अँड पोल्ट्री, भऊर