भूमिपूजनाचे निमंत्रण न दिल्याने नगरसेविकेच्या पतीचा धिंगाणा

भूमिपूजनाचे निमंत्रण न दिल्यामुळे अमरावतीमधील एका नदगरसेविकेच्या पतीने महापालिकेत आयुक्तांच्या कक्षांमध्ये काळा रंग फेकून जाहीर निषेध केला.

Amaravati
corporator husband Brawl at Amravati Municipal commissioner office
भूमिपूजनाचे निमंत्रण न दिल्याने नगरसेविकेच्या पतीचा धिंगाणा

अमरावतीमध्ये भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण न दिल्यामुळे नगरसेविकेच्या पतीने महापालिकेत धिंगाना घातला. नगरसेविकेला विश्वासात न घेता अमरावती शहरातील साई नगर प्रभागात उभारण्यात येणाऱ्या ऑक्सिजन पार्कच्या भूमिपूजनाचे निमंत्रण देण्यात आले नव्हते. त्यामुळे नाराज झालेल्या नगरसेविकेच्या पतीने सोमवारी दुपारच्या सुमारास महापालिका आयुक्तांच्या कक्षामध्ये काळा रंग फेकून जाहीर निषेध केला. अचानक घडलेल्या या घटनेने महापालिकेमध्ये चांगलीच खळबळ उडाली.

काय आहे नेमकं प्रकरण?

मनपाअंतर्गत येणाऱ्या साई नगर – फॉरेस्ट कॉलनी येथे प्रस्तावित असलेल्या ऑक्सिजन पार्कचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले. मात्र या कार्यक्रमाला प्रभागातील नगरसेविकेला निमंत्रण दिले नसल्याने, संबंधित नगरसेविकेच्या पतीने सोमवारी मनपा आयुक्त संजय निपाणे यांच्या कक्षाच्या नामफलकावर काळा रंग फेकून निषेध केला. प्रस्तावित ऑक्सिजन पार्क हा मनपा, राज्य सरकार व केंद्र सरकारच्या निधीतून बांधण्यात येणार असल्याने या भूमिपूजन कार्यक्रमाला संबंधित सर्व लोकप्रतिनिधींना आमंत्रित करावे अशी मागणी या नगर सेविकेच्या पतीने आयुक्तांकडे केली होती, मात्र मनपा आयुक्तांनी याची दखल न घेतल्याने प्रशांत जाधव यांनी हे आंदोलन केले. यावेळी मनपा परिसरात काहीकाळ गोंधळ निर्माण झाला होता. या प्रकरणी मनपा उपायुक्त यांनी शहर कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here