‘कैद्याचा मृत्यू झाल्यानंतर रुग्णालयात नेणार का?’

पोटात दुखत असूनही पोलिसांनी तज्ज्ञ डॉक्टरांकडे नेले नाही, म्हणून न्यायालयाने कैद्याचा मृत्यू झाल्यानंतर रुग्णालयात नेणार का? अशा शब्दात पोलिसांना सुनावले आहे.

Pune
court
प्रातिनिधिक फोटो

पोलिसांनी तीन आठवड्यापासून तज्ज्ञ डॉक्टरांकडे नेले नसल्याची तक्रार येरवडा कारागृहात असलेला आरोपी महेश राऊत याने न्यायालयात केली. त्यावर न्यायालयानेही कैद्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याला रुग्णालयात नेणार का? असा सवाल करत करागृह प्रशासनाला सुनावले. माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून महेश राऊत सध्या येरवडा कारागृहात आहे.

हेही वाचा – चौकशी कुणी करायची, हे आरोपी ठरवू शकत नाहीत

काय सांगितले कैद्याने?

एल्गार परिषद आयोजन आणि कोरेगाव भीमा प्रकरणातील आरोपी शोमा सेन आणि अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग यांच्या जामीन अर्जावर विशेष न्यायाधीश किशोर वडणे यांच्या खंडपीठात सुनावणी सुरू आहे. सुनावणी दरम्यान राऊत याने न्यायालयाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. महेश राऊत याने न्यायालयास सांगितले की, ‘मागील अनेक दिवसांपासून माझ्या पोटात वेदना होत आहेत. त्यावर तज्ज्ञ डॉक्टरांना भेटून उपचार घ्यावे, असे डॉक्टरांनी सांगितले. मात्र मागील तीन आठवद्यापासून डॉक्टरांकडे नेण्यात आले नाही’. यावर कारागृह प्रशासनाने सांगितले की, ‘महेश राऊत याला ससूनला नेण्यासाठी एस्कॉट उपलब्ध होत नाही. एस्कॉट येईपर्यंत संबंधित डॉक्टरांची वेळ संपते, त्यामुळे ते घरी जातात’. पोलिसांच्या या स्पष्टीकरणावर न्यायालयाने मात्र नाराजी व्यक्त करत कैद्याचा मृत्यू झाल्यावर रुग्णालयात नेणार का? असा सवाल केला. तसेच कारागृह प्रशासनाने स्वत:चे एस्कॉट घेवून त्याला त्वरीत रुग्णालयात न्यावे, असे आदेश दिले.


हेही वाचा – मल्टिप्लेक्स असोसिएशनला कोर्टाने सुनावले खडे बोल