घरमहाराष्ट्रराज्यातील स्थगिती सरकार फार काळ टिकणार नाही

राज्यातील स्थगिती सरकार फार काळ टिकणार नाही

Subscribe

 नारायण राणे यांची टीका

राज्यात सत्तेवर आलेले तीन पक्षांच्या आघाडीचे सरकार हे पाहुणे सरकार आहे, ते फार काळ टिकणार नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना प्रशासनातले काही कळत नाही. ते विकास कामांना स्थगिती देत सुटले आहे. त्यामुळे हे जनतेचे सरकार नसून स्थगिती सरकार आहे, अशी टीका भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केली आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्गात आयोजित पत्रकार परिषदेमधून नव्या सरकारवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सत्तेवर आलेले सरकार हे पाहुणे सरकार आहे, ते फार काळ टिकणार नाही. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी केवळ स्वार्थापोटी एकत्र येत हे सरकार स्थापन केले आहे. गेल्या काही दिवसांत सरकारने विविध विकासकामांना स्थगिती दिलेली आहे. सरकारकडून विविध विकासकामांना स्थगिती दिली जात आहे. सत्ता बदलल्या-नंतर कोकणातील विविध विकासकामेही ठप्प झाली आहेत.

त्यामुळे या सरकारचे स्थगिती सरकार असे नामकरण करता येईल, असा टोला राणेंनी लगावला. जिल्ह्यात आढावा बैठका घेणार खासदार विनायक राऊत यांच्यावरही राणेंनी जोरदार टीका केली. शिवसेना आता सत्तेत नाही. त्यामुळे विनायक राऊत यांनी कोणत्या अधिकारांमध्ये जिल्ह्यात आढावा बैठक घेतली. सत्तारुढ पक्षाचे खासदार नसताना त्यांनी शासकीय अधिकार्‍यांना कोणत्या अधिकारात आदेश दिले.असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच बेकायदेशीर बैठका घेऊन शिवसेनेकडून काम करत असल्याचा भास निर्माण केला जात आहे, असेही राणे म्हणाले. महाविकास आघाडीचे सरकार हे विकास करण्यासाठी अस्तित्वात आलेले नसून काम बंद करण्यासाठीच आले आहे. ठेकेदाराला बोलावून त्याच्याकडून पैसे उकळण्यासाठीच हे सर्व चाललेले आहे. हे तिन्ही पक्ष वैयक्तिक स्वार्थासाठी एकत्र आले आहेत. शेतकरी, कामगार किंवा उद्योजकांसाठी हे सरकार एकत्र आलेले नाही, अशी टीकाही नारायण राणे यांनी केली.

- Advertisement -

राज्यात तीन पक्षांना एकत्र येत स्थापन केलेले सरकार हे कसे उपयुक्त नाही याची माहिती आम्ही जनतेला देणार आहोत. त्यासाठी 15 ते 18 डिसेंबरदरम्यान गाव बैठका घेणार आहोत, असेही राणेंनी सांगितले. तसेच क वर्ग देवस्थानांना मिळणार्‍या निधीला स्थगिती देण्याचा निर्णयाला आम्ही विरोध करू, तसेच विकासाबाबतचा अन्यायही सहन करून घेणार नाही, असा इशारा नारायण राणे यांनी दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -