Cyclone Nisarga: रायगडमध्ये पहिला बळी: वीजेचा खांब कोसळून ५८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू!

Raigad
Cyclone Nisarga 58-year-old man died after an electric pole fell on him in Alibag area of Raigad
Cyclone Nisarga: रायगडमध्ये पहिला बळी: वीजेचा खांब कोसळून ५८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू!

निसर्ग चक्रीवादळामुळे रायगडमध्ये पहिला बळी गेलेला आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये वीजेचा खांब पडल्याने ५८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. बंगलेवाडी उमटे येथली ही घटना आहे. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे.

आज साडे बाराच्या सुमारास निसर्ग चक्रीवादळ अलिबागला धडकलं. यावेळेस वेगाने वारे वाहत होते. त्यामुळे वीजेचे खांब कोसळले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार एमएसडीसीएल कंपनीचा डीपी पोल कोसळला. यामध्ये ५८ वर्षीय दशरथ बाबू वाघमारे हे गंभीर झाले होते. या घटनेची माहिती मिळाताच त्यांना तातडीने वैद्यकीय मदत पाठवण्यात आली होते. मात्र त्याचा उपचारादरम्यान दुदैवी मृत्यू झाला आहे.

निसर्ग चक्रीवादळ अलिबाग ओलांडून मुंबईच्या दिशेने येत होते. मात्र मुंबईकरांचा धोका टळला असून चक्रीवादळाने मार्ग बदलला. अलिबाग नंतर चक्रीवादळ मुंबईकडे न येता पनवेल, कर्जत, खोपोली, नाशिक या मार्गाने जाणार असल्याची माहिती मिळत आहे. पुणे वेधशाळेच्या प्रमुख हवामान संशोधक डॉ. अनुपम कश्यपी यांना हा अंदाज वर्तवला आहे. मुंबईवरील धोका टळल्यामुळे सहा वाजल्यापासून पुन्हा हवाई वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आतापर्यंत सर्वाधिक फटका मुरुड आणि श्रीवर्धनाला बसला आहे. वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. तातडीने जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे.


हेही वाचा – मुंबई विमानतळावर फेडएक्स विमान धावपट्टीवरुन घसरले