नगरमध्ये आढळला रेल्वे ट्रॅकवर पत्रकारचा मृतदेह

या पत्रकाराच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट

Ahmadnagar

मंगळवारी दुपारी अहमदनगरमध्ये रेल्वे ट्रॅकवर एक मृतदेह आढळून आला. हा मृतदेह एका नगरमधील पत्रकाराचा असून त्यांचे नाव उमेश शिवनाथ दारुणकर असे होते. ४० वयवर्ष असणाऱ्या उमेश शिवनाथ दारुणकर यांच्या अकस्मात घडलेल्या मृत्यूची नोंद नगरच्या रेल्वे पोलिस स्टेशनला करण्यात आली आहे. माहिती रेल्वे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या पत्रकाराच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

गेल्या १५ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असणारे दारुणकर हे एका हिंदी दैनिकासाठी जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करत होते. मंगळवारी दुपारी साडेतीन-चार वाजेच्या दरम्यान नगर-कल्याण रोडवरील रेल्वे उड्डाणपुलाखाली रेल्वे रुळांवर एक मृतदेह आढळून आला.

याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेतला. मृत व्यक्तीच्या खिशात असलेल्या ओळखपत्राच्या आधारे दारुणकर यांची ओळख पटली असून त्यांच्या पश्चात कुटुंबामध्ये आई, वडील, पत्नी, मुलगा, भाऊ आहे.